सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली रस्ते, चौक, मैदाने अडवण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी एकजूट केली असतानाच या उत्सवांच्या काळात होणाऱ्या नागरिकांच्या अडवणुकीविरोधात आता ठाण्यातील नामवंत वकिलांची फौज उभी ठाकली आहे. सार्वजनिक ठिकाणे अडवून उत्सव साजरे केले जाऊ नयेत, यासाठी उच्च न्यायालयाने नव्याने दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी केली जावी, यासाठी ठाणे, कल्याण परिसरातील आठ ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयातच हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली होणारी रहिवाशांची अडवणूक, दांडगाई, ध्वनीप्रदुषण या गोष्टींवर अंकुश घालण्यासाठी उच्च न्यायालयाने अलिकडेच काही आदेश दिले. मात्र, या आदेशाला धार्मिक वळण देऊन त्याची पायमल्ली करण्यासाठी राजकीय पक्ष आणि मंडळे एकवटली आहेत. या नेतेमंडळींना रोखण्यासाठी आता ठाण्यातील आठ ज्येष्ठ वकील मैदानात उतरले आहेत. उत्सवातील दांडगाईविरोधात ठाण्यातील महेश बेडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत हस्तक्षेप (इंटरव्हेन्शन) याचिका दाखल करण्याचा निर्णय या वकिलांनी घेतला आहे. अ‍ॅड. मकरंद पंचाक्षरी यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रकांत बाबर देसाई, गजानन चव्हाण, प्रशांत पंचाक्षरी, राजेंद्र अभ्यंकर, रशीद खान, शैलेश सडेकर, देवेंद्र पांडे, सुनील भाटिया यांनीही या याचिकेला पाठिंबा दिला आहे.
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षांपूर्वी उत्सवांच्या काळात दांडगाई करणाऱ्यांच्या बाबतीत जो निर्णय दिला आहे. त्याची उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घ्यावी. आणि या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी या हस्तक्षेप याचिकेत करण्यात आली आहे.
‘ठाण्यात रस्ते अडवून नवरात्र, गणेशोत्सव साजरे करण्यात येत होते. नागरिकांना हा सतत होणारा त्रास विचारात घेऊन ठाणे जिल्हा न्यायालयात १९९८ मध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर डिसेंबर २००५मध्ये निकाल देताना उत्सवांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी या आदेशांची अंमलबजावणी करावी, अशी सूचना न्यायालयाने केली होती. मात्र, त्याची आजवर अमलबजावणी झालेली नाही,’ असे याचिकाकर्ते अ‍ॅड. प्रशांत पंचाक्षरी यांनी सांगितले.  ‘नवरात्रोत्सव काळात जांभळी नाक्यावर देवीचा उत्सव असतो. हा विभाग शांतता विभागात येतो. या भागात न्यायालय, नागरी रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा आहेत. तरीही या विभागात नेहमी उत्सव काळात गोंगाट असतो. सगळे कायदे, नियम पायदळी तुडवले जातात. त्यामुळे ही हस्तक्षेप याचिया केली आहे,’असे अ‍ॅड. मकरंद पंचाक्षरी यांनी सांगितले.