ठाणे : ठाण्यातील वरिष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे-शिरडकर (६८) यांचे गुरुवारी करोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रांतून शोक व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे. ठाण्यातील दमाणी इस्टेटमध्ये सोपान बोंगाणे-शिरडकर राहत होते. ते राजकीय क्षेत्रातील जाणकार होते. त्यांनी लोकसत्ता तसेच सामना, पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये काम केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.