ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन

शहरी भागात शिक्षण, रोजगार, समाज विकासाच्या अनेक संधी आहेत. या संधी ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत. यामुळेच भारतीय समाज व्यवस्थेत विषमतेची दरी तयार झाली आहे. ही दरी बुजवायची असेल तर ज्ञानयुगातील शिक्षण, आरोग्य, विकास, तंत्रज्ञान, मूलभूत अशा सर्व सुविधांचा ग्रामीण भागाला लाभ मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी रविवारी येथे केले.

रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीतर्फे माधव सदाशिव गोळवलकर यांच्या नावाने देण्यात येणारा श्रीगुरुजी पुरस्कार बंगळूरु येथील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. आच. आर. नागेंद्र यांना संशोधन कार्याबद्दल, वेदान्ताचे गाढे अभ्यासक व प्रसिद्ध कीर्तनकार पंढरपूरचे चैतन्य महाराज देगलुरकर यांना धर्मसंस्कृती कार्याबद्दल देण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, एक लाखाचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमाला संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, डॉ. रवींद्र साताळकर, बाळकृष्ण महाराज, दादा कल्लोळकर, दिगंबर पाटील उपस्थित होते.

भारतामधील दोनतृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. येथील लोकांचे दरडोई उत्पन्न शहरी भागापेक्षा अध्र्याहून कमी आहे. आताचा काळ ज्ञानयुगाचा आहे. ज्ञानयुगातील शिक्षण, आरोग्य व अन्य सुविधांचा लाभ शहरी तरुण वेगाने घेऊन प्रगतीच्या दिशेने जात आहे. त्या प्रमाणात ग्रामीण भागातील तरुणाला ज्ञानयुगातील या संधी मिळत नाहीत, असे काकोडकर म्हणाले.

डॉ. नागेंद्र यांनी योग, योगाचे महत्त्व या विषयावर, चैतन्य महाराजांनी गुरुजींच्या एकनिष्ठता व समर्पण विषयावर विचार व्यक्त केले.