ठाणे शहरात पायाभुत सुविधा उभारणी तसेच विविध प्रकल्पांच्या आखणीसाठी महापालिकेला आता कोरियाच्या सेऊल मेट्रोपोलिटीन सरकारचे सहकार्य मिळणार आहे. महापालिका प्रशासन आणि सेऊल मेट्रोपोलिटीन सरकार यांच्यात सेऊल येथे महत्वपुर्ण सामंजस्य करार झाला असून शहरातील पाणी, घनकचरा, अपांरपारिक उर्जा अशा नियोजीत प्रकल्पांना तेथील सरकारची तांत्रिक व आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
गेल्या आठवडय़ात कोरियाच्या सेऊल मेट्रोपोलिटीन सरकारच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांना सहकार्य करणार असल्याचे सेऊलच्या शिष्टमंडळाने जाहीर केले होते. तसेच यासंबंधीच्या सांमजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सेऊल येथे आंमत्रित केले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण हे शिष्टमंडळ गेल्या तीन दिवसांपासून सेऊलच्या दौऱ्यावर आहे. सोमवारी या शिष्टमंडळासोबत सेऊल सरकारची एक बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे शहरातील पायाभूत सुविधांची आखणी करण्यासाठी विविध प्रकल्पांना आर्थिक सहकार्य उपलब्ध करुन देण्याची तयारी सेऊल सरकारकडून दाखविण्यात आली. यावेळी जयस्वाल आणि सेऊल मेट्रोपोलिटीन सरकारच्या इंटरनॅशनल को.ऑपरेशन ब्युरोचे महासंचालक यी बायोनघन यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा सामजंस्य करार झाला असून कोरियन सरकारकडून भारताला मिळणाऱ्या निधीतील काही वाटा महापालिकेस मिळण्याची शक्यता आहे.

हे प्रकल्प होणार..
२४ तास पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुर्नवापर प्रकल्प, अपारंपारिक उर्जा निर्मिती, नागरिकांसाठी उर्जा कार्यक्षमता या प्रकल्पासाठी महापालिकेला सेऊल सरकारचे सहकार्य मिळणार आहे