लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वतंत्र्य पशु वैद्यकीय विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील मोकाट गुरे, भटके कुत्रे तसेच पाळीव प्राण्यांवर उपचारांची सोय या माध्यमातून होणार आहे. यासाठी पशुतज्ज्ञ पद प्रशासनाने मंजूर केले आहे.

पत्रीपुलाजवळ पालिकेचे निर्बिजीकरण केंद्र आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने त्यांचे निर्बिजीकरण करण्याची प्रक्रिया मागील १५ वर्षांपासून सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून निर्बिजीकरण केंद्राचा कारभार एका ठेकेदारामार्फत चालविला जातो. या केंद्रात आता पालिकेने आरोग्य निरीक्षक युवराज बोरुले यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे.

निर्बिजीकरण केंद्र आणि पालिका यांच्यात समन्वय,केंद्रातील अडचणी, तक्रारी तात्काळ दूर व्हाव्यात, या केंद्राचा विस्तार आणि अधिकाधिक भटकी, जखमी, आजारी कुत्र्यांना येथे वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. केंद्रात एक पालिकेचा पशुवैद्यकीय डॉक्टर कायमस्वरुपी नेमला जावा, अशा आशयाचा अहवाल आरोग्य निरीक्षक बोरुले यांनी पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे पाठविला होता. त्यामुळे शहरातील गाई, बैल, घोडे याशिवाय गाढवांवर उपचार करता येणार आहेत. अनेकदा मोकाट गुरे जखमी होतात. या जखमा चिघळतात. त्यामुळे गुरांना संसर्ग होण्याची शक्यता असते. तो धोका आता टळण्याची शक्यता आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांशी चर्चा करून प्राण्यांचे उपचार आणि सेवेसाठी पालिकेत स्वतंत्र पशुवैद्यकीय विभाग सुरू करण्यास मान्यता दिली. पालिकेच्या आकृतीबंधात हे पद समाविष्ट करण्यात आले आहे.