वाहन चाचणीसाठीही कार्यालयाच्या आवारातच मार्गिका

आशीष धनगर, लोकसत्ता

डोंबिवली : जेमतेम चार खोल्यांच्या अपुऱ्या जागेतून कारभार हाकणाऱ्या कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला लवकरच स्वतंत्र इमारत मिळणार आहे. उंबर्डे येथे उभारण्यात येणाऱ्या या इमारतीच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून इमारतीच्या आवारातच वाहनांच्या चाचणीसाठी मार्गिकांची निर्मितीही करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूर या शहरांतून येथे येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

येत्या दोन वर्षांत ही नवी इमारत उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी सहा कोटी रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या शहरांमधील वाहनांची नोंदणी कल्याण शहरातील बिर्ला शाळेजवळ असणाऱ्या कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात करण्यात येते. विस्तारत जाणाऱ्या या शहरांमध्ये दरवर्षी ६० ते ७० हजार नव्या वाहनांची खरेदी केली जात असून या सर्व वाहनांची चाचणी आणि नोंदणी कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात करण्यात येते. असे असले तरी या उपप्रादेशिक कार्यालयाचे कामकाज गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ चार खोल्यांमधून चालवले जाते. पुरेशा जागेअभावी या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची तपासणी शहराच्या बाहेर सुमारे १० किलोमीटरवर असणाऱ्या नांदिवली येथील मार्गिकेवर करण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहनांच्या तपासणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बोलले जाते. तसेच जुन्या कार्यालयाच्या परिसरात वाहनांसाठी वाहनतळ अपुरे पडते. यामुळे कल्याण उपप्रादेशिक कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारावी आणि इमारतीच्या जवळ वाहन तपासणी मार्गिका असावी अशी मागणी काही वर्षांपासून जोर धरू लागली होती. तसा प्रस्तावही शासनाकडे कार्यालयातर्फे पाठवण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी शासनाकडून या कार्यालयाला मंजुरी मिळाली असून कल्याण डोंबिवली महापालिकेने उंबर्डे परिसरातील भूखंड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी दिला आहे.

या ठिकाणी सार्वजानिक बांधकाम विभागातर्फे नव्या इमारतींची उभारणी करण्यात येणार असून नुकतीच या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. या इमारतीच्या शेजारीच वाहनांच्या तपासणीसाठी प्रशस्त चाचणी मार्गिकेची उभारणी करण्यात येणार असल्याने नांदिवली येथील वाहन तपासणीला जाण्याचा अधिकाऱ्यांचा आणि नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

नव्या कल्याणमधील पहिली इमारत

कल्याण शहरातील उंबर्डे परिसरात नवे आणि आत्याधुनिक स्मार्ट कल्याण शहर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या भागात नवी प्रशासकीय कार्यालये उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे नव्या कल्याण शहरातील पहिले प्रशस्त कार्यालय असणार आहे. तसेच या कार्यालयाच्या उभारणीमुळे नव्या कल्याण शहराच्या बांधकामांचा शुभारंभ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.