प्रत्येक तालुक्यात पोलिसांच्या निवासस्थानासाठी स्वतंत्र इमारती

पालघर जिल्ह्य़ातील पोलिसांच्या घराचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. प्रत्येक तालुक्यात पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात सात पोलीस ठाण्यातील पोलिसांसाठी घरे बांधण्यास मंजुरी मिळालेली आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीदेखील बांधल्या जाणार आहेत.

पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. या जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यात मिळून एकूण ३५०० अधिकारी व कर्मचारी आहेत. परंतु या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी स्वत:ची घरे नाहीत. मुळात पोलीस ठाण्याच्या इमारती जुन्या आणि बिकट अवस्थेत आहेत. तेथे पोलिसांसाठी घरे निर्माण करणे कठीण होते.

त्यासाठी पालघरच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी पोलिसांसाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळातर्फे घरे बांधता येतील का याची चाचपणी केली आणि त्यानुसार मंडळाला प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे.

याबाबत बोलताना शारदा राऊत यांनी सांगितले की, पोलीस ठाण्याच्या इमारती या जीर्ण झालेल्या होत्या. विक्रमगड पोलीस ठाणे तर अगदी ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे पोलिसांसाठी स्वतंत्र अद्ययावत इमारत बांधण्याचे आम्ही ठरवले. त्याचवेळी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना घरे देता येतील का हा विचार केला. इमारतींबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. प्रत्येक तालुका स्तरावर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी वसाहत असणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यावर अवलंबून न राहता महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळातर्फे ही घरे बांधली जाणार आहेत.

पोलीस ठाण्याच्या इमारतींचे नूतनीकरण

पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्याच्या इमारती जुन्या आणि भाडय़ाने घेतलेल्या आहेत. माणिकपूर, केळवे आणि सफाळे पोलीस ठाणे वसाहती या आजही भाडय़ाच्या इमारतीत कार्यरत आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पोलीस ठाण्याच्या इमारतींची डागडुजी तसेच दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जाते. परंतु या विभागातील संथपणा तसेच भ्रष्टाचारामुळे पोलीस वसाहतींची दुरवस्था झाली होती. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्नाळा सागरी हे पोलीस ठाणे असले तरी त्याचे काम आगाशी चौकीतून चालते. आगाशी चौकी ही भाडय़ाच्या इमारतीत आहे. अर्नाळा सागरी आणि केळवे पोलीस ठाण्याच्या बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. यासाठी प्रत्येकी ४८ लाख रुपये खर्च येणार आहे.

म्हाडाच्या वसाहतीत पोलिसांना घरे

विरारच्या बोळिंज येथे म्हाडातर्फे मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत आहे. या म्हाडाच्या इमारतीत पोलीस अधीक्षकांनी ६०० घरे पोलिसांसाठी मागितली आहेत. त्यातील १०० घरे पोलीस अधिकाऱ्यांसाठी आणि ५०० घरे ही पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आहेत. शासनाने या घरांचे पैसे भरल्यानंतर ही घरे पोलिसांना देण्यात येतील, असे शारदा राऊत यांनी सांगितले.

तुळिंज आणि माणिकपूरला जागा शोधण्याचे आदेश

नालासोपारामधील तुळिंज पोलीस ठाणे नाल्यावर उभे आहे, तर वसईतील माणिकपूर पोलीस ठाणे हे भाडय़ाच्या इमारतीत आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यांना जागा शोधण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत. जागा निश्चित झाली की महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळातर्फे इमारत आणि पोलीस वसाहत बांधण्यात येईल. पण या दोन्ही पोलीस ठाण्यांनी त्यात फार स्वारस्य न दाखवल्याने त्यांना स्मरणपत्र पाठवून तात्काळ जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत.

*  पोलिसांसाठी घरे आणि इमारती बांधण्यासाठी पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी खास पोलीस इमारत शाखा (बिल्डिंग ब्रांच) तयार केली आहे.

*  पोलीस सुरक्षा विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले हे या शाखेचे प्रमुख आहेत.

*  प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी वसाहतीचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.

*  पहिल्या टप्प्यात विरार, अर्नाळा, डहाणू, विक्रमगड, मनोर, जव्हार आणि केळवा या पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत.

नव्या पोलीस इमारतींमुळे पोलीस ठाण्याच्या अडचणी दूर होणार आहेत, तर पालघर जिल्ह्यातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न सुटणार आहे. पोलीस गृहनिर्माण मंडळ घरे बांधणार असल्याने त्यांचा दर्जा उत्तम असणार आहे. तालुकास्तरावर या इमारती असल्याने पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या सुखसुविधा मिळू शकतील.

– शारदा राऊत, पोलीस अधीक्षिका, पालघर