|| जयेश सामंत

ठाणे महापालिकेकडून तिसऱ्या लाटेचे नियोजन सुरू

ठाणे : राज्य सरकारकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचे सूतोवाच होताच ठाणे महापालिकेने आरोग्य व्यवस्थेचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली असून शहरात उभारण्यात आलेल्या करोना रुग्णालयांमध्ये लहान मुले तसेच बालकांसाठी स्वतंत्र्य कक्ष तसेच उपचारव्यवस्था उभी करण्यासाठी प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे. महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तातडीने शहरातील बालरोगतज्ज्ञांशी सल्लामसलत करून पार्किंग प्लाझा येथे पहिल्या टप्प्यात लहान मुलांवरील उपचारांसाठी १०० खाटा आरक्षित ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. ठाणे महापालिकेच्या अहवालानुसार करोनाकाळात शून्य ते १० वयोगटातील ३७८८ बालके बाधित झाली आहेत. यामध्ये चार बालकांचा मृत्यू झाला आहे तर सद्य:स्थितीत या वयोगटात एकही उपचाराधीन रुग्ण नाही. ११ ते २० वयोगटात ७ हजार ७०० जणांना करोनाची बाधा झाली असून मृत्यूचे प्रमाण अवघे सहा आहे. सद्य:स्थितीत या वयोगटातील ६२७ रुग्ण सक्रिय असून यापैकी अनेकांना सौम्य लक्षणे आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ठाण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची एक बैठक मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीत उपस्थितांनी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका          लक्षात घेऊन तयारी करायला हवी असा मुद्दा मांडला. या लाटेत लहान मुलांना अधिक त्रास जाणवू शकतो, असा मुद्दाही चर्चेत आला. या बैठकीनंतर महापौर नरेश म्हस्के आणि डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील काही बालरोगतज्ज्ञांनी एक तातडीची बैठक बोलावली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिकेने लहान प्रमाणात प्राणवायू प्रकल्पांची उभारणी करून पार्किग प्लाझा येथे ३५० खाटांची व्यवस्था सुरू केली आहे. याच ठिकाणी लहान मुलांसाठी अतिरिक्त १०० खाटांची व्यवस्था उभी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी लहान मुलांसाठी ५० प्राणवायू खाटा तसेच २५ अतिदक्षता विभागातील खाटा आणि २५ अतिरिक्त खाटांचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. नियोजनाच्या दृष्टीने अशी तयारी आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. लहान मुलांसाठी कृत्रिम श्वासनयंत्रणा उभी करताना वेगळ्या प्रकारची यंत्रणा आवश्यक असते. नव्याने काढण्यात येणाऱ्या निविदेत ३ ते १३ वयोगटातील बालकांसाठी आवश्यक असणारी व्हेंटिलेटर खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिली. तसेच या वयोगटातील मुलांवर उपचार करत असताना त्यांच्या सोबतीला आई अथवा पालक असणे आवश्यक असते. त्यामुळे खरेदी करण्यात येणाऱ्या खाटांचा आकार मोठा असावा, अशा सूचनाही आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.