सात नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार; पदे रद्द करण्याची कार्यवाही सुरू
कल्याण-डोंबिवली पालिकेतील सर्व पक्षांमधील सात नगरसेवकांचा बेकायदा बांधकामे करण्यामध्ये थेट सहभाग आहे. या नगरसेवकांची पदे रद्द करण्याच्या कारवाईच्या नस्ती (फाइल्स) पालिकेने तयार केल्या आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून या नगरसेवकांवर पाच वर्षांत कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणात शासनाने हस्तक्षेप करावा, अशी गोपनीय तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची तक्रार झाल्याने अनेक नगरसेवक चिंताग्रस्त आहेत. बेकायदा बांधकामप्रकरणी दोषी आढळूनही तत्कालीन आयुक्तांनी दोषी नगरसेवकांना पाठीशी घालण्यात पुढाकार घेतला. बेकायदा बांधकामे करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे नगरसेवकांनी बांधकामांचा धडाका सुरूच ठेवला. आता पाठीशी घालण्यास पालिकेत मनासारखा आयुक्त नाही. राज्य सरकारमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. शासनाने पालिका प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले तर, ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळण्यात अडचण येईल. तसेच बेकायदा बांधकामांमधील सहभागाबद्दल दोषी ठरले तर पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येत नाही.
काही नगरसेवकांची ऐन उमेदीत राजकीय कारकीर्द ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेकायदा बांधकामांमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस, मनसेच्या एकूण सहा ते सात नगरसेवकांची इत्थंभूत माहिती मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्यात या भागातील काही जाणकार मंडळी यशस्वी झाली आहेत. बेकायदा बांधकाम प्रकरणांमध्ये सेनेच्या नगरसेवकांचा अधिक सहभाग असल्याने या पक्षाच्या नेत्यांना शह देण्यासाठी कारवा़ईचा बडगा शासनाकडून उचलला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अधिक माहितीसाठी आयुक्त ई. रवींद्रन, अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. बेकायदा बांधकामांशी संबंधित काही नगरसेवकांची माहिती शासनाने मागविली आहे. प्रशासनाकडे तशा आशयाचे पत्र आले आहे, अशी माहिती मिळाली आहे, असे भाजपच्या एका लोकप्रतिनिधीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

शिवसेनेचे अधिक नगरसेवक
डोंबिवली पश्चिमेत तीन, कल्याण पूर्वेत तीन, टिटवाळा येथे एक नगरसेवक बेकायदा बांधकामांमध्ये थेट सहभागाबद्दल दोषी आढळला आहे. बेकायदा बांधकामे करणाऱ्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचा अधिक सहभाग आहे.