एकाच कुटंबातील सात जण नऊ महिन्यांपासून बेपत्ता

नालासोपाऱ्यातील म्हस्के कुटुंबीय बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच आता याच शहरातील एकाच कुटुंबातील नऊ जण बेपत्ता झाले आहेत. या कुटुंबातील सदस्यांचा काहीच पत्ता लागत नसून त्यांच्या बेपत्ता होण्यामागील गूढ वाढलेले आहे. तुळींज पोलीस त्यांचा शोध घेत असून घातपाताची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.

नालासोपारा पूर्वेच्या नालेश्वर नगर येथील बैष्णव सदन या इमारतीत रामदास इगवे हे पत्नी मंगलाबाई इगवे (४२) तसेत दोन मुले, त्यांच्या दोन सुना तसेच तान्ह्य़ा नातवंडासह राहात होते. भाविन इगवे (२५), त्याची पत्नी आशा इगवे(२२), त्यांचे एक महिन्याचे तान्हे बाळ, तसेच सचिन इगवे (२४) त्याची पत्नी उजव इगवे (२१) अशी त्यांची नावे आहेत. रामदास इगवे हे मूळचे कर्नाटक गुलमर्ग येथील वाडी गावात राहणारे होते. ज्योतिषी हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यांची मुलेही गावोगाव फिरून भविष्य सांगण्याचा व्यवसाय करत होती. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून हे संपूर्ण कुटुंब बेपत्ता झाले आहे. इगवे यांच्या सुनेच्या आईने मागील आठवडय़ात तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

इगवे यांचा मुलगा भाविन याला जानेवारीत मुलगा झाला होता. बाळंतपणासाठी त्याची पत्नी माहेरी गेली होती. एक महिन्याने ती सासरी परत आली. काही दिवसांनी तिची आई राजश्री घरावत हिने संपर्क केला असता तो झाला नाही. मग घरी जाऊन पाहिले असता घर बंद होते. घरातील सगळ्यांचे मोबाइल बंद होते. कामानिमित्त कुठे बाहेर गेले असतील, असे त्यांना वाटले. दुसरी सून उज्वला हिच्या कुटुंबीयांनीही संपर्क केला, पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर त्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली.

आम्ही सर्व नातेवाईकांकडे, मूळ गावी जाऊन शोध घेतला. पण काहीच पत्ता लागला नसल्याचे चुलत भाऊ चैतन्य इगवे यांनी सांगितले.

इगवे कुटुंबीय गावोगाव फिरून ज्योतिषीचा धंदा करतात. ते यापूर्वीही अनेक महिने परगावी जाऊन परत येत असायचे. या प्रक रणातही तसेच काहीसे असण्याची शक्यता आहे, तरी आम्ही सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेत आहोत. त्यांचे मोबाइल क्रमांक ट्रेस करत आहोत. ते आंध्र प्रदेशात असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कुठलाही घातपात असण्याची शक्यता नाही.

किरण कबाडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज

म्हस्के कुटुंब परतले

१७ नोव्हेंबरपासून नालासोपाऱ्यातून बेपत्ता असलेले म्हस्के कुटुंबीय घरी परतले आहेत. ते महिन्याभरापासून आळंदी येथे होते. आशीष म्हस्के (२३), पत्नी प्रीती (२०) आणि सहा महिन्यांचा मुलगा रिहान याच्यासह बेपत्ता झाले आहे. या प्रकरणी प्रीतीच्या आईने तुळींज पोलीस ठाण्यात ते तिघे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती, पण ते आळंदी येथेच मुक्कामाला होते.