गंभीर करोना रुग्णांची परवडअतिदक्षता कक्षात खाटांची कमतरता; डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव

जयेश सामंत-नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाने गंभीररीत्या आजारी असलेल्या रुग्णांच्या उपचाराची यंत्रणा डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे अक्षरश: धापा टाकू लागली आहे. शहरातील १७ पैकी १३ कोविड रुग्णालयांतील अतिदक्षता कक्षात एकही खाट उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांवर नेमका कोठे उपचार करायचा, असा प्रश्न आरोग्य विभागापुढे उभा राहिला आहे. महापालिकेने बाळकूम भागात उभ्या केलेल्या करोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ७६ खाटा रिकाम्या असल्या तरी तेथे डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना दाखल करता येणे शक्य नाही.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविली असून यामुळे शहरात रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. शहरात दररोज ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत असून त्यापैकी गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांसाठी शहरात पुरेशा आयसीयू खाटा उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे. शहरात एकूण १७ कोविड रुग्णालये असून त्यात जिल्हा रुग्णालयाचाही समावेश आहे. १७ पैकी १३ कोविड रुग्णालयांच्या अतिदक्षता कक्षात आता नव्या रुग्णांसाठी जागा नाही. उर्वरित चार रुग्णालयांमध्ये केवळ आठच आयसीयू खाटा उपलब्ध आहेत.

ठाणे येथील साकेत भागातील ग्लोबल इम्पॅक्ट हब इमारतीमध्ये महापालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मदतीने एक हजार खाटांचे कोविड रुग्णालय उभारले आहे. पण तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी मिळत नसल्याने रुग्णालयातील ७६ आयसीयू खाटा वापराविना रिकाम्या असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर कोविड रुग्णालयातील खाटांची माहिती देण्यात येत असून त्यामध्ये या रुग्णालयातील ७६ आयसीयू खाटा रिकाम्या दाखविण्यात येत आहे.

महापालिकेला डॉक्टर मिळेना

ठाणे येथील साकेत भागातील ग्लोबल इम्पॅक्ट हब इमारतीमध्ये महापालिकेने एक हजार खाटांचे कोविड रुग्णालय उभारले असून याशिवाय मुंब्रा आणि कळवा या ठिकाणी अशाच प्रकारचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीची जाहिरात महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काढली जात आहे. आतापर्यंत दहा वेळा जाहिरात काढूनही महापालिकेला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मिळत नसल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.

रुग्णांना इतरत्र हलवण्याच्या सूचना

ठाणे शहरात गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता कक्षात जागा नसल्यामुळे सात-आठ दिवस उलटूनही उपचारांना प्रतिसाद देत नसलेल्या रुग्णांना इतरत्र हलविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. शहरातील काही खासगी कोविड रुग्णालयांमधून अशा प्रकारच्या सूचना नातेवाईकांना दिल्या गेल्याचे प्रकार उघडकीस आले असून गंभीर अवस्थेतील या रुग्णांसाठी दुसऱ्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत का याचा शोध घेत नातेवाईकांची परवड सुरू असल्याचे चित्र आहे. अतिदक्षता विभागात खाटाच उपलब्ध नसल्यामुळे येथे रुग्ण भरतीच्या रांगा असून प्रतिसाद मिळत नसलेल्या रुग्णांना हलवून इतर रुग्णांना तेथे प्रवेश देण्याची वेळ व्यवस्थापनांवर ओढवली आहे.

ग्लोबल इम्पॅक्ट हब इमारतीमधील रुग्णालयात सद्य:स्थितीत आयसीयूसाठी सहा तज्ज्ञ डॉक्टर, सहा वैद्यकीय अधिकारी, तीन एमबीबीएस डॉक्टर, ४४ बीएएमएस आणि बीएचएमएस, १९४ नर्स काम करीत आहेत. तसेच या रुग्णालयातील २८ आयसीयू खाटांवर रुग्णांचे उपचार सुरू आहेत.  – संदीप माळवी, उपायुक्त, महापालिका

ठाण्यातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध आयसीयू खाटा

०२ जिल्हा शासकीय रुग्णालय

०१ वेदांत रुग्णालय

०१ स्वास्तिक रुग्णालय-

०४ वेलएम रुग्णालय