भाजीच्या मळ्यांना फटका; नळांवर रांगा

कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील पोसरी, चिंचवली, भाल, म्हात्रेपाडा, मलंगवाडी, वसार, द्वारली, नेवाळी परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुरेसे पाणी येत नसल्याने महिलांना परिसरातील विहिरी, कूपनलिकांचा आधार घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

नेवाळी, मांगरूळ परिसरातील रहिवासी गाव परिसरातील उपलब्ध पाण्यावर भेंडी, वांगी, कारली, मुळा व इतर भाज्यांची लागवड करतात. त्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने शेतक री चिंतेत आहेत. गावाच्या परिसरातून गेलेले सांडपाण्याचे नाले, गटारे अडवून ते पाणी लागवडीसाठी वापरले जात आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधींना कळवूनही त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. फेब्रुवारीपासून पाणीटंचाई भेडसावू लागल्याने पुढील तीन महिन्यांत या दुर्भिक्ष्यावर मात कशी करायची या विवंचेनत ग्रामस्थ आहेत.

बहुतेक गावांमध्ये नळपाणी योजना आहे. सार्वजनिक नळकोंडाळे अनेक ठिकाणी आहेत. मात्र, पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने महिलांना नळावर रांगा लावाव्या लागत आहेत. शेतीची कामे करायची आणि घरात आल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करायची अशी अवस्था असल्याचे भानुबाई म्हात्रे यांनी सांगितले.

सधन कुटुंबांनी घराजवळ कूपनलिका बसविल्या आहेत. त्यामुळे गावातील विहिरी वर्षांनुवर्षे स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीत. त्या गाळ, कचऱ्याने भरल्या आहेत, असे पोसरीतील ग्रामस्थांनी सांगितले.

मलंग पट्टय़ातील गावे कल्याण, अंबरनाथ ग्रामीण आणि एमआयडीसी हद्दीत विभागली गेली आहेत. या गावांना पाणीटंचाईची तक्रार करण्यासाठी अंबरनाथ एमआयडीसीत जावे लागते. तिथे अधिकारी उपस्थित असतील याची खात्री नसते. त्यामुळे ग्रामस्थ तिथे जाणे टाळतात. आमदार, खासदारांचे दौरे असले की फक्त तेवढय़ा पुरते अधिकाऱ्यांचे चेहरे दिसतात, असे म्हात्रेवाडीतील रहिवाशांनी सांगितले. काकोळे गावातील रहिवाशांनी दोन आठवडय़ांपूर्वी गावात एका उद्घाटन समारंभासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना पाणीटंचाईच्या प्रश्नावरून घेराव घातला होता. नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते.

पाणीटंचाईचा प्रश्न सोडविला नाही तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामीण भागाच्या वाटय़ाला जो पाणीसाठा आहे तो त्यांना नियमित पुरवला जातो. गावांची लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर होत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिक माहितीसाठी डोंबिवली, अंबरनाथ एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

चोरीमुळे टंचाईत भर

कल्याण, अंबरनाथ ग्रामीण भागांत मोठय़ा प्रमाणात इमारती, गाळे, चाळींची बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीतील पाणी चोरले जाते. काटई-बदलापूर रस्त्यावर २० ते २५ गॅरेज चालक मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून पाणी वापरतात. अनेक ढाबे, हॉटेल चालकही अशाच पद्धतीने पाणी चोरतात. याचा फटका ग्रामीण भागाला बसतो, असे केसरी म्हात्रे यांनी सांगितले.