26 February 2021

News Flash

ठाणे शहरात भीषण पाणीटंचाई

पारसिकनगर, खारेगाव या भागासह कळव्यातील अन्य भागांत अनेक सदनिका असणारी मोठी गृहसंकुले आहेत.

अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठय़ामुळे नागरिक हैराण

संपूर्ण जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद होऊनही गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणावर पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून काही भागात अपुऱ्या तर अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठय़ामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. कळवा आणि घोडबंदर भागातील नागरिकांना या पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसत आहे, तर लोकमान्यनगर परिसरातील रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्य़ात २ हजार ५२३ मिमी इतकी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र यामध्ये दुपटीने वाढ होऊन ४ हजार २४६ मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणारी बारवी, भातसा आणि आंध्रा ही धरणे काठोकाठ भरून वाहत असली तरी ठाण्यातील विविध भागात नागरिक मात्र सुरळीत आणि सुयोग्य पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे मेटाकुटीला आले आहेत. अधिक लोकवस्तीचा परिसर असणाऱ्या कळवा, घोडबंदर आणि लोकमान्यनगर या भागातील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई आणि दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कळव्यातील बहुतांश भागातील गृहसंकुलांना औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी रात्री अचानकपणे दुरुस्तीच्या कारणास्तव एमआयडीसीकडून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. कळव्यातील गृहसंकुलांना दररोज ३० एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. एमआयडीसीकडून शुक्रवारी रात्री अचानक घेण्यात आलेल्या शटडाऊनचा परिणाम रविवापर्यंत राहिल्याने शेकडो कुटुंबांचे पाण्याअभावी हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

पारसिकनगर, खारेगाव या भागासह कळव्यातील अन्य भागांत अनेक सदनिका असणारी मोठी गृहसंकुले आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार तीनही दिवस पाणी नसल्याने येथील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. तर मोठी गृहसंकुले असणाऱ्या घोडबंदर भागातील विजय गार्डन, धर्माचा पाडा, ब्रह्मांड, माजिवडा, कासारवडवली यांसारख्या परिसरातील वसाहतींमध्ये पाणीटंचाईमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. येथील १० ते १५ वर्षे जुन्या गृहसंकुलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे. या गृहसंकुलांच्या टाक्यांची क्षमता अधिक असली तरी पाण्याची पातळी मात्र कमी असल्याने या गृहसंकुलांना पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमधून पाण्याचा प्रवाहही कमी होत आहे. त्यामुळे घोडबंदर येथील या जुन्या गृहसंकुलांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

लोकमान्यनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा

लोकमान्यनगर परिसरातील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. मलवाहिनी आणि गटाराच्या दूषित पाण्याचा शिरकाव पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या वाहिनींमध्ये होत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे या भागात राहणारे स्थानिक रहिवासी विकास राऊत यांनी सांगितले.

या परिसरात पाणीटंचाई

कळवा, पारसिकनगर, खारेगाव, घोडबंदर, विजय गार्डन, धर्माचा पाडा, ब्रह्मांड, माजिवडा, कासारवडवली, लोकमान्यनगर या भागांत पाणीटंचाई आहे.

कळव्यातील बहुतांश मोठी लोकवसाहत असणाऱ्या भागाला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी प्राधिकरणाकडून अचानक शटडाऊन घेण्यात आला होता. याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर होऊन नागरिकांना दोन दिवस पाणीपुरवठा झाला नाही. तसेच लोकमान्यनगर येथील दूषित पाण्याच्या समस्येचा थांगपत्ता लागला असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. – अर्जुन अहिरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:47 am

Web Title: severe water scarcity thane city akp 94
Next Stories
1 महापालिका आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी
2 नगरपालिकांची संकेतस्थळांवर माहितीचा अभाव
3 एसीबी चौकशीसाठी पूर्वपरवानगी देण्यास पालिका तयार
Just Now!
X