14 August 2020

News Flash

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कागदावरच

महापालिकेचा मात्र १७ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होत असल्याचा दावा

महापालिकेचा मात्र १७ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होत असल्याचा दावा

वसई : शहरातील बहुचर्चित सांडपाणी प्रकल्पाची मुदत संपून तीन वर्षे उलटली तरी अद्याप पूर्ण झालेला नाही. विशेष म्हणजे या प्रकल्पातून १७ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा पालिकेने दावा केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने यापूर्वीच पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

शहरातील सांडपाणी थेट समुद्र आणि खाडीत न सोडता त्यावर प्रक्रिया करून ते दुय्यम उपयोगासाठी वापरले जावे यासाठी पालिकेने सुरू केलेली सांडपाणी प्रकल्प योजना मुदत उलटून तीन वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण झाली नाही. २०१२ मध्ये या योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. २०१७ मध्ये केंद्र शासनाला पाठवलेल्या अहवालात या योजनेचे काम ९० टक्के झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु २०२० मध्येही काम पूर्ण झालेले नाही. उलट या प्रकल्पातून दररोज १७ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे पालिकेने सांगितले. पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. या प्रकल्पासाठी असलेल्या दोन किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार असल्याची

माहिती त्यांनी दिली. २०१७ मध्ये काम ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मग उर्वरित १० टक्के काम तीन वर्षांनंतरही पूर्ण कसे झाले नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

धरणापेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया?

या सांडपाणी प्रकल्पातून दररोज १७ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याची नवी माहिती पालिकेने दिली आहे. हे पाणी दुय्यम उपयोगासाठी वापरणे अपेक्षित होते. मात्र पाणी विरारच्या ग्लोबस सिटीजवळील नाल्यात सोडले जात असल्याचा दावा करण्यात आला. जर नाल्यात १७ दशलक्ष लिटर पाणी सोडले गेले तर नाल्याला पूर येईल. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणातून दररोज १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. म्हणजे धरणाच्या पाण्यापेक्षाही जास्त पाणी प्रक्रिया करून नाल्यात सोडले जाते. ही एकप्रकारची दिशाभूल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केला. या योजनेत अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून याविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे योजना?

शहरातील इमारतींमधून निघणारे दूषित सांडपाणी थेट समुद्रात आणि खाडीत जात असल्याने पाणी दूषित होऊन जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. तसेच जलप्रदूषण होते. त्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. वसई-विरार महापालिका हद्दीतील सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरता यावे म्हणून महत्त्वाकांक्षी सांडपाणी प्रकल्प २०११ साठी सुरू करण्यात आला होता. केंद्र शासनाच्या सॅटेलाइट सिटी योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेअंतर्गत १०६ कोटींची योजना मंजूर आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाने ७८ कोटी २२ लाख ३६ हजार निधी दिला आहे. राज्य शासन आणि पालिकेले १० टक्के निधी दिला आहे. या प्रकल्पात संपूर्ण पालिका क्षेत्रातून निघणारे सांडपाणी या भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून एका जागी एकत्रित करून प्रक्रिया करणे आणि तेच पाणी दुय्यम वापरासाठी उपलब्ध करून दिले जाणार होते.

प्रकल्पाचे काम सुरू झाले असून दररोज १७ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित कामही लवकर पूर्ण केले जाईल.

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:03 am

Web Title: sewage treatment project only on paper zws 70
Next Stories
1 वसईतील चिंचोटी धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू
2 ठाणे जिल्ह्य़ात १,५७६ जणांना संसर्ग
3 ईदचे बकरे ठाण्याच्या वेशीवरच
Just Now!
X