21 January 2021

News Flash

मुंब्रा खाडीला निर्माल्याचे ग्रहण

मुंब्रा खाडीवरील पूल धोकादायक ठरला असताना आता या पुलालगत निर्माल्याचे ढिग साचू लागले आहे.

हारतुऱ्यांच्या कचऱ्यामुळे खाडीवर प्लास्टिक पिशव्यांचे थर

रेती माफियांच्या अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल गमावून बसलेल्या मुंब्र्यातील खाडीला आता निर्माल्याच्या कचऱ्याने आपल्या कवेत घेतले असून गेल्या काही दिवसांपासून तर प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरलेले निर्माल्याचे थर या ठिकाणी लागत आहेत. फुले, हार आदी निर्माल्य पर्यावरणाला घातक नसले तरी ते ज्या पिशव्यांमधून फेकले जाते, त्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे खाडीतील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारांमुळे खाडीची खोली कमी होत असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.

ठाण्यातील बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून ठाण्यातील खाडी किनाऱ्याच्या खारफुटीचा अभ्यास केला जात आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अभ्यासकांनी केलेल्या सर्वेक्षणादरम्यान मुंब्य्राची खाडी कचराभूमी बनल्याचे दिसून आले आहे. रेती माफियांच्या अतिक्रमणांमुळे मुंब्रा खाडीवरील पूल धोकादायक ठरला असताना आता या पुलालगत निर्माल्याचे ढिग साचू लागले आहे. या निर्माल्यासोबत येणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्याही खाडीभर पसरत चालल्या आहेत. त्यामुळे येथे मासेमारी करणेही आता दुरापास्त होऊ लागले आहे, अशा प्रतिक्रिया स्थानिक कोळी बांधवांनी दिली. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात या भागात निर्माल्याप्रमाणेच थर्माकॉलच्या मखरांचा कचरा फेकला जात असल्यामुळे खाडीतील पाणीदेखील दूषित होत आहे. थर्माकॉलचा कचरा इतका मोठय़ाप्रमाणात असतो की त्यामुळे खाडीतील पाणीही झाकोळून जाते, अशा तक्रारी पुढे येत आहेत.

रेल्वेतून कचराफेक

कल्याण-ठाणे दरम्यानच्या प्रवासादरम्यान मुंब्रा खाडीमध्ये प्रत्येक लोकलमधून अनेक प्लास्टिकच्या पिशव्यांमधील निर्माल्य टाकले जाते. अनेक वेळा हे निर्माल्या काठावर पडल्याने ते  तेथे पडून राहून त्यांचा खच होत आहे. खाडीत निर्माल्य टाकताना त्यासाठी वापरली जाणारी प्लास्टिकच्या पिशवीचा त्रास मोठा असून निर्माल्य टाकताना ते झाडाच्या पानामध्ये अथवा कागदामध्ये गुंडाळल्यास तेथील प्रदुषण कमी होऊ शकते. मात्र नागरिक या सूचनेकडे डोळेझाक करत असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले.

मासेमारीला फटका

खाडीत प्लास्टिकची पिशवी पडल्यामुळे ती परिसरात वर्षांनुवर्ष पडून राहते. माशांना पोहण्यासाठी त्याचा अडथळा होऊन त्यामध्ये अडकून मासे मरतात. शिवाय हे प्लास्टिक खाल्लानेही त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे मोठय़ा माशांप्रमाणेच लहान जीवांच्या वाढीस त्याचा फटका बसतो. या भागातील थर्माकॉलचे प्रदूषणही मोठे असते. त्यामुळे येथील मासे मृत्युमुखी पडून त्याचा फटका मच्छीमारांच्या व्यवसायावर होत आहे, असे मत बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील पर्यावरण संशोधक प्राध्यापक गोल्डिन कॉड्रॉस यांनी मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2016 1:17 am

Web Title: sewage waste discharging into in mumbra creek
Next Stories
1 नातवंडांच्या भविष्यासाठी आजोबांची ‘मशागत’
2 चोरलेल्या दुचाकींची विक्री करून सामान्यांची फसवणूक
3 कलंकित नगरसेवकांसाठी भाजपच्या पायघडय़ा
Just Now!
X