बदलापूर शहरातील नाले अजून तुंबलेलेच असून पावसाळा तोंडावर आला असला तरी शहरातील नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सध्या कायम असून नगराध्यक्षपदाची निवडणूक उशिराने म्हणजे १८ मे रोजी संपन्न होणार असल्याने नालेसफाईलाही उशीर झाल्याचे बोलले जात आहे.पाऊस सुरू होण्याआधी नालेसफाई पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या तरी नालेसफाई अद्याप सुरूच झालेली नाही. पावसाळ्यात नाल्यांमधील वाढलेल्या पाण्याचा शहरातील कात्रप, शिरगाव, जोवेली, खरवई, बॅरेज रोड, हेंद्रेपाडा, बेलवली, मांजर्ली, स्टेशन रोडच्या रेल्वे लाइनला लागून असलेला भाग येथील रहिवाशांना फटका बसतो. निवडणुकीची आचारसंहिता कायम असल्याने प्रशासनाने आता आपल्याच पातळीवर निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या चार दिवसांत जेसीबी, ट्रक, सफाई कर्मचारी आदींच्या सहाय्याने शहरातील सर्व नाल्यांची सफाई सुरू करत असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी स्पष्ट केले.