03 December 2020

News Flash

रस्तेकामाला मलनिस्सारण वाहिन्यांचा अडथळा

मागील महिनाभर खोदून ठेवलेल्या या रस्तेकामात कोणतीही प्रगती दिसत नसल्याने प्रवासी, आजुबाजुचे रहिवासी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

काँक्रीटीकरणासाठी रस्ता खोदल्यानंतर त्या खाली १६ फूट खोलीवर मलनिस्सारणाच्या वाहिन्या आढळून आल्या आहेत.

खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे रहिवासी, वाहनचालक त्रस्त

लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या महात्मा फुले रस्त्यावरील जगन्नाथ शंकर शेठ मार्ग ते स्वामी विवेकानंद शाळा या दरम्यान सीमेंट काँक्रीटीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या निधीतून पालिकेने सुरू केले आहे. मागील महिनाभर खोदून ठेवलेल्या या रस्तेकामात कोणतीही प्रगती दिसत नसल्याने प्रवासी, आजुबाजुचे रहिवासी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. खोदून ठेवलेल्या रस्त्यात फुटलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांमधील पाणी येऊन तुंबत असल्याने या ठिकाणी ठेकेदाराला काम करणे अवघड झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘एमएमआरडीए’च्या निधीतून हे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. ते वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामात विलंब झाला तर ठेकेदाराला विलंब लागलेल्या कामाची वाढीव किंमत पालिका प्रशासनाला देण्याचा अधिकार नाही. प्राधिकरणाकडून वाढीव निधी या कामासाठी मागण्याची तरतूद नाही. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होईल यासाठी पालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंते प्रयत्नशील आहेत. परंतु काँक्रीटीकरणासाठी रस्ता खोदल्यानंतर त्या खाली १६ फूट खोलीवर मलनिस्सारणाच्या वाहिन्या आढळून आल्या आहेत. डोंबिवली नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत १९८२च्या दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या वाहिन्या टाकल्या आहेत. त्यांची कधीच देखभाल न केल्याने त्या जागोजागी फुटल्या आहेत.

रस्ते खोदकाम करण्यापूर्वी फुटलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांची माहिती नसल्याने आता काम करताना मोठा अडथळा उभा राहिला आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यात मलनिस्सारण वाहिन्यांचे पाणी येऊन तुंबते ते जेट पंप लावून उपसले तरी पुन्हा भरते. मलनिस्सारण विभागाच्या अभियंत्यांनी हे पाणी थोपविण्यासाठी सीमेंटच्या राडारोडाने भरलेल्या गोणी फुटलेल्या वाहिन्यांच्या तोंडावर आणून ठेवल्या. यामुळे खोदलेल्या रस्त्यात मलपाणी येणे थांबले असले तरी फुले रस्त्यावरील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयापर्यंतच्या सोसायटय़ांच्या परिसरातील मलटाक्या भरून वाहू लागल्या. मलमार्गिका बंद केल्याने अनेक सोसायटय़ांच्या आवारात मलपाणी तुंबू लागले.

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील मलवाहिन्या महात्मा फुले रस्ता, जगन्नाथ शंकरशेठ रस्ता मार्गे, दीनदयाळ रस्ता, रेतीबंदर चौक मार्गे मोठा गाव येथील उदंचन केंद्रात सोडल्या आहेत. काही वाहिन्या द्वारका हॉटेल रस्ता, शास्त्रीनगर रुग्णालय ते कोपर अण्णानगर येथील उदंचन केंद्रात सोडण्यात आल्या आहेत.

काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी महात्मा फुले रस्त्याने आलेले मलपाणी जगन्नाथ शंकरशेठ मार्गे (गोपी मॉल) वळण देऊन दीनदयाळ रस्त्याने मोठागाव उंदचन केंद्रात सोडू, असे बांधकाम विभागाचे अभियंता मलनिस्सारण अभियंत्यांना सांगत आहेत. त्याची दखल मल विभागातील अभियंते घेत नसल्याचे कळते. फुटलेल्या मलवाहिन्या तात्काळ दुरुस्त किंवा बदलण्यासाठी आमच्या विभागाकडे निधी नाही, अशी कारणे हे अधिकारी बांधकाम अभियंत्यांना देत आहेत. या दोन विभागांच्या रस्सीखेचीमध्ये काम कसे करायचे, असा प्रश्न ठेकेदाराला पडला आहे.

सर्वाधिक वर्दळीचा, अरुंद असलेला हा रस्ता खोदून ठेवल्याने या भागात सकाळ, संध्याकाळ वाहन कोंडी होत आहे. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक सेवक नाहीत. परिसरातील रहिवासी या सगळ्या प्रकाराने हैराण आहेत.

महात्मा फुले रस्त्यावरील मलवाहिन्या ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. त्या खराब झाल्या आहेत. या वाहिन्या नवीन टाकण्यासाठी एक विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाली नाही. फुले रस्ता खोदल्याने मलवाहिन्यांचे पाणी त्या भागात येते. हे पाणी चार जेट पंप लावून उपसा केले जाते. पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर ते इतस्थत: पसरते. काम अवघड आहे, पण पाणी उपसा करून काँक्रीटीकरणाचे काम लवकर सुरू होईल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
– अनंत मादगुडी, कार्यकारी अभियंता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 2:52 am

Web Title: sewer line hurdles in road works dd70
Next Stories
1 शिक्षकांसाठी कल्याण-डोंबिवलीत करोना चाचणी केंद्रे
2 महामार्गावर वाहतूक पोलिसांची ‘अति’कर्तव्यदक्षता
3 कमी खर्चात करोनावर नियंत्रण
Just Now!
X