शहापूरमधील आदिवासी गावातील युवतीची यशोगाथा; शिवणकलेतून कुटुंबाचा उदरनिर्वाह

गावात सुविधा तर दूरच; प्राथमिक गरजा पूर्ण करणारी साधनेही नाहीत. शिक्षणाचा मागमूस नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी अवघे गाव शहराबाहेरील वीटभट्टय़ांवर राबण्यासाठी स्थलांतर करते. पण तरीही पावसाळय़ाच्या दिवसांत उदरनिर्वाहाचा प्रश्न अवघ्या गावासमोर उभा ठाकतो. अशा प्रकारे अंधश्रद्धा, कुपोषण, निरक्षरता, व्यसनाधीनता या समस्यांनी ग्रासलेल्या शहापूर तालुक्यातील अवाळा गावातील एका तरुणीने शिवणकलेतून स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला. तिच्या या व्यवसायाने तिच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा पेच सोडवलाच; पण गावातील अन्य महिलांच्या भटक्या आयुष्याला स्थैर्याचा मार्ग दाखवला आहे.

शहापूर तालुक्यातील अवाळा हे गाव आदिवासी वस्ती असलेले. पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असले तरी या गावात कोणत्याही प्राथमिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. या ठिकाणी राहणाऱ्या कातकरी ग्रामस्थांची स्वत:ची जमीन नसल्याने शेती करणेही शक्य नाही. शिक्षणाची सुविधाच नसल्याने गावातील बहुसंख्य ग्रामस्थ अर्धशिक्षित किंवा निरक्षर आहेत. परिणामी उदरनिर्वाहासाठी गावातील सर्वच कुटुंबे शहरांच्या वेशीवर असणाऱ्या वीटभट्टय़ांवर काम करण्यासाठी स्थलांतर करतात. वर्षांचे आठ महिने वीटभट्टय़ांवर राबल्यानंतर पावसाळय़ात या भट्टय़ा बंद होत असल्याने ही कुटुंबे गावी परततात. पण त्या चार महिन्यांत उदरनिर्वाहाचा पेच अतिशय गंभीर होतो.

लहानपणापासून ही सगळी परिस्थिती अनुभवणाऱ्या पुष्पा वाघने दहावीपर्यंतचे शिक्षण नेटाने पूर्ण केले. कुटुंबाची आर्थिक कुवत नसल्याने तिला उच्च शिक्षण घेता आले नाही. मात्र, औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिवणकलेचा अभ्यासक्रम शिकून ती या कलेत पारंगत झाली. त्यानंतर स्वत:च प्रयत्न करून तिने केंद्र सरकारच्या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत अनुदान मिळवले आणि शिवणकाम व्यवसाय सुरू केला. यातून तिला आर्थिक उत्पन्न मिळू लागले असून त्यामुळे तिच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे.

पुष्पा ही अवाळा गावातील एकमेव महिला शिवण व्यावसायिक आहे. त्यामुळे गावातील महिला तिच्याकडूनच कपडे शिवून घेतात. त्यांनाही पुष्पाच्या कर्तबगारीचे कौतुक आहे. पुष्पाची शिवणकला तिच्या कुटुंबाला सक्षम करण्यापुरतीच मर्यादित असली तरी, तिच्या या धडपडीने गावातील अन्य महिला आणि तरुणींनाही प्रोत्साहन दिले आहे. विशेष म्हणजे,  गावातील अन्य महिलांना शिवण व्यवसाय शिकवण्यासही सुरुवात केली आहे. यातून त्या स्वयंरोजगाराचे साधन शोधू शकतील, असा विश्वास तिला वाटतो.

गेली अनेक वर्षे मजुरीवर घराचा कारभार होत असल्याने रोजगारासाठी कुटुंबासह स्थलांतर करावे लागत होते. जिद्द आणि मेहनतीने शिकायचे ठरवले आणि शिवणकाम व्यवसाय उभा केला. त्यामुळे कुटुंबाला गावाबाहेर स्थलांतर करावे लागत नाही. गावातील इतर महिलांनादेखील शिवणकाम शिकवण्याचा प्रयत्न करत आहे.

 -पुष्पा वाघ