मंदिर हे भक्तिभावाचे स्थान असले तरी शांत-निवांतपणा हवा असेल तर मंदिरासारखी दुसरी जागा नाही. सध्या सर्वत्र शनी देवतेची चर्चा आहे. शनीचे माहात्म्य जनमानसात पसरत चालल्याने जागोजागी शनी मंदिरांची उभारणी केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरसारखीच दिसणारी मंदिरे उभारली जातात, जणू काही भक्तांना शनिशिंगणापूरलाच आलो आहे, असे वाटावे. कल्याण-मलंगगड रस्त्यावर असलेले एक निसर्गरम्य शनी देवालय लक्ष वेधून घेते.. करवलेचे शनी मंदिर.

शनिदेवाचे महत्त्व व माहात्म्य सांगणे हा या लेखाचा उद्देश नाही, तर निसर्गरम्य वातावरणातील एका सुंदर राऊळाची माहिती देण्यासाठी हा लेखप्रपंच.

कल्याणहून मलंगगडाकडे जाताना नेवळी फाटा लागतो. नेवळी फाटय़ाहून दोन मिनिटे अंतरावर उसाटणेला जाण्यासाठी आणखी एक फाटा फुटतो. याच उसाटणे फाटय़ावर असलेली ‘श्री क्षेत्र शनी मंदिर, करवले’ अशी पाटी लक्ष वेधून घेते. या रस्त्यावरून आत जाताना हिरवाकंच निसर्गाचा अद्भुत नजारा दिसतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, मध्येच नितळ पाण्याचा ओढा हे सारे मन सुखावून टाकते. उसाटणे फाटय़ावरून १० ते १५ मिनिटे अंतरावर करवले गाव लागते. याच गावात एका शेताच्या बाजूला हे रम्य देवालय आहे.

शनिशिंगणापूरच्या धर्तीवरच या मंदिराची रचना केलेली आहे. एका मोठय़ा पटांगणात दोन मंदिरे आहेत. एक शनिदेवाचे आणि एक हनुमानाचे. दोन्ही मंदिरे लहान आकाराची असली तरी संगमरवरी आहे. हनुमानाच्या मंदिरात देवाची भलीमोठी शेंदूर लावलेली मूर्ती आहे. शनिशिंगणापूरला असलेली शनी देवतेची शिळाही येथे आहे. काळ्या पाषाणातील ही शिळा लक्ष वेधून घेते. उंचावर वसवलेल्या या शिळेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते, शिळेवर भाविकांकडून तेल वाहण्यात येते.

हे मंदिर कधी बांधले याविषयी येथील ग्रामस्थांना विचारले तर कुणी निश्चित माहिती देऊ शकले नाही. काही जणांनी खूप वष्रे झाली असे सांगितले, तर काहींनी १० ते १२ वष्रे झाली असावी, असे सांगितले. या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे या ठिकाणी दोन घटकाभर निवांत बसावेसे वाटते. मंदिराच्या बाजूलाच एक आंब्याची बाग आहे. शनी देवतेचे दर्शन घेऊन या आमराईत निवांतपणे बागडता येते. उन्हाळ्याच्या काळात तर येथे आंबेही मिळतात. त्याशिवाय मंदिराच्या आजूबाजूला विविध भाजीपाल्यांची शेती मन मोहून टाकते.

निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणातील या शनी मंदिराचा परिसर मन प्रसन्न करतो.

कसे जाल?

  • कल्याणहून मलंगगड रस्त्याने पुढे गेलेल्या नेवाळी फाटय़ाच्या पुढे उसाटणेला जाणारा आणखी एक फाटा लागतो. या फाटय़ावरून सहा किलोमीटर अंतरावर हे शनी मंदिर आहे.
  • कल्याणहून उसाटणे, कारोले, नारहेन या ठिकाणी जाणाऱ्या केडीएमटी आणि एसटी बस आहेत. या मार्गावरच हे मंदिर आहे.
  • ठाण्याहून शीळ फाटामार्गे, बदलापूर जंक्शन येथून नेवाळी फाटा आणि पुढे या मंदिरापाशी जाता येते.