प्रशस्त गृहसंकुल, लहान मुलांना खेळण्यासाठी लहानशी बाग, स्वच्छ सुंदर परिसर, खेळती हवा अशा वातावरणात एखादे घर असावे अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा असते. डोंबिवलीतील शंखेश्वरनगरमध्ये घर घेतानाही येथील रहिवाशांच्याही याच अपेक्षा होत्या. एमआयडीसी निवासी विभागात असलेले शंखेश्वर हे शहरातील काही मोठय़ा गृहसंकुलांपैकी एक आहे. मात्र येथे सुविधांऐवजी गैरसोयीच जास्त असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

[jwplayer zVOMyVTv]

शंखेश्वर नगर, एमआयडीसी निवासी विभाग, मानपाडा रोड, डोंबिवली (पू.)

डोंबिवली पूर्व विभागात मानपाडा रस्त्यावर एमआयडीसी निवासी विभागात शंखेश्वरनगर आहे. त्यात प्रत्येकी सात मजल्याच्या नऊ इमारतींचा समावेश आहे. राकेश संघवी या बांधकाम व्यावसायिकाने १९९८ मध्ये या इमारतीचे बांधकाम सुरू केले. २००० पर्यंत मुंबई व उपनगरातील अनेक नोकरदार तसेच काही डोंबिवलीकरांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी येथे घालत या इमारतीत घर घेतले. ९ विंग असलेल्या सात मजली सोसायटीमध्ये एकूण २७० घरे आणि ६३ दुकाने आहेत. २००५ मध्ये सोसायटीची स्थापना झाली. त्या काळी डोंबिवली शहरातील पहिली मोठी सोसायटी म्हणून या सोसायटीची ओळख होती. डोंबिवली शहरापासून थोडे लांब अंतरावर असले तरी बस अथवा स्वत:च्या वाहनाने ठाणे, नवी मुंबई अथवा मुंबईत नोकरीनिमित्त जाणाऱ्या नागरिकांसाठी हे सोयीचे आहे. त्या वेळी तीन ते चार लाख रुपयांना घेतलेल्या घराची किंमत आता ३० ते ३५ लाखांच्या घरात गेली आहे. सर्व जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात.

प्रशस्त जागेत असलेल्या टोलेजंग इमारतींमध्ये राहायला जाण्याचे स्वप्न असलेल्या चाकरमान्यांनी येथे घर घेतले खरे, मात्र येथे राहायला येताच त्यांचा भ्रमनिरास झाला. कारण सुखसुविधांऐवजी निरनिराळ्या समस्या त्यांच्या पदरात पडल्या. अगदी सुरुवातीला म्हणजे २००० मध्ये येथे वातावरण चांगले होते. मात्र पुढे औद्योगिक विभाग शेजारी असल्याने तेथील कारखान्यांतील प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होऊ लागला. सोसायटीच्या शेजारीच असलेल्या एका कारखान्याच्या धुरांडय़ाची उंची कमी असल्याने सुरुवातीला येथील लोकांच्या घरात तेथील धूळ घरात जमा होत होती. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला. काही नागरिकांनी प्रदूषणाच्या त्रासामुळे येथील घर सोडले. अखेर नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठवून कारखान्याला धुरांडय़ाची उंची वाढविण्यास भाग पाडले. तेव्हापासून धूळयुक्त कण घरात जमा होत नाहीत, परंतू वायुप्रदूषणाचा त्रास आजही अधूनमधून नागरिकांना होत असल्याचे सदस्य श्याम पाटील यांनी सांगितले.

पाण्याची बोंब

शंकेश्वर नगरचा परिसर कालांतराने वाढत गेला. सुरुवातीला व्यावसायिकाने ए १ व ए ९ या इमारतींसाठी एमआयडीसीकडून पाणी घेतले. त्यानंतर याच सोसायटीचे पाणी पुढे सी, डी, ई, एफ, जी या सोसायटय़ांनाही पुरविण्यात येत असल्याने ‘ए’ इमारतीला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या सर्व सोसायटय़ांचे महिन्याचे ६५ हजार रुपये बिल ‘ए’ सोसायटीधारकांनाच भरावे लागते. पूर्वी आम्ही ग्रामपंचायतीला वर्षांला ३ लाख ४६ हजार रुपये कर भरत होतो. यंदा कर पालिकेमध्ये भरायचा असल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय अद्याप सोसायटीला कन्व्हेअन्स डीडही प्राप्त झालेले नाही, असे सोसायटीचे अध्यक्ष प्रेमनाथ मालोदे यांनी सांगितले.

बाजारपेठ लांब

मानपाडा रस्त्यावर असले तरी हे गृहसंकुल बाजारपेठेपासून लांब आहे. त्यामुळे नागरिकांची काहीशी गैरसोय होते. या परिसरात जवळपास रुग्णालय नाही. सोसायटीमध्ये एक-दोन डॉक्टर असून गरज पडल्यास त्यांची मदत नागरिकांना होते. मोठय़ा आजारपणातील औषध उपचारासाठी मात्र त्यांना डोंबिवली शहर गाठावे लागते. खाजगी शाळा जवळ आहेत. विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी बससुविधा आहेत.  त्यामुळे शिक्षणाची उत्तम व्यवस्था आहे. मात्र भाजी मंडई, मासळी बाजार जवळपास नाही. त्यामुळे रस्त्यावर बसणारे विक्रेते, तसेच सोसायटीमधील दुकानदारांकडून ज्या वस्तू उपलब्ध होतील, त्यावर वेळ मारून न्यावी लागते. पूर्वी सायंकाळी सात-आठनंतर रिक्षाचालक या परिसरात येत नसत. आता रिक्षांची व्यवस्था झाली असली तरी त्यांची संख्या कमी असल्याने त्याचा त्रास होतो. केडीएमटीच्या बसेसची सुविधा आहे, परंतू तीही अपुरी आहे. त्यामुळे रात्री उशिराने घरी येणाऱ्या नोकरदार महिलांची गैरसोय होते. अनेकदा नाइलाज झाल्याने महिला रिक्षाचालकाशेजारी चौथ्या सीटवर बसूनही प्रवास करतात, अशी माहिती सदस्य देतात.

रोडरोमियो, सोनसाखळी चोरांचा उच्छाद

मानपाडा रोड व भोपर रोडवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा मोठा सुळसुळाट असून त्यांचा जास्त त्रास नागरिकांना होतो. सोनसाखळी चोरीच्या घटना या परिसरात अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखादी पोलीस चौकी उभारावी अशी मागणी गेली कित्येक वर्षे नागरिक करीत आहोत. मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही. सोसायटीच्या आवारात रात्रीच्या वेळेस अनेक खाजगी बसेस उभ्या राहतात. या बसेसचा व अंधाराचा फायदा घेत अनेक तरुण जोडपी येथे अश्लील चाळे करीत उभे असतात. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांना येथून हटविले जाते. मात्र या प्रकारांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पोलीस चौकी उभारण्याची आवश्यकता असल्याचे पोलीसमित्र गौरी पांचाळ यांनी सांगितले. सुरक्षेसाठी सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून आणखी ८ कॅमेरे यंदा बसविण्यात येणार असल्याचेही मालोदे यांनी सांगितले.

सोसायटीच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रम राबविले जातात. होळी, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. वार्षिक स्नेहसंमेलन भरवून सर्व नागरिक एका दिवशी एकत्र जमून वेगवेगळे खेळ खेळणे, स्पर्धा घेणे, नृत्य, गायन अशा स्पर्धातून आपली कला सादर करून हे दिवस आनंदात साजरे करतात.

वर्षांतून एकदा सोसायटीतील नागरिक रक्तदानाचा सामाजिक उपक्रम राबवितात. तसेच सोसायटीमध्ये एक छोटेखानी क्लबहाऊस आहे. तिथे मुलांसाठी नृत्यवर्ग, ज्युडो कराटेवर्ग भरविले जातात. दर गुरुवारी महिलांसाठी धार्मिक कार्यक्रम आखले जातात.

पावसाळ्याच्या आधी तसेच दोन महिन्यांतून एका सोसायटी आवारात औषध फवारणी, धूर फवारणी केली जाते. या कामी येथील समाजसेवक प्रकाश म्हात्रे यांचे वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभले. आमच्या अडीअडचणीला ते धावून आले असून आमच्या समस्या सोडविण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार असल्याचे अध्यक्ष मालोदे यांनी सांगितले.

पूर्वी या परिसरात रस्ता कच्चा होता. त्यामुळे अनेक अपघात होत होते. मात्र सहा वर्षांपूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण केले असल्याने अपघातांची संख्या कमी झाली आहे. पावसाळ्यात केवळ खड्डय़ांचा त्रास मोठय़ा प्रमाणात होतो. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक कचराकुंडी आहे. येथे ग्रामस्थ व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा टाकतात. वेळोवेळी तो कचरा उचलला जात नसल्याचा त्रास जाणवतो. सोसायटीच्या कुंपणालगत अनेक अनधिकृत टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. पालिकेच्या वतीने काही अनधिकृत दुकानदारांना हटविण्यात आले असले तरी त्यांनी पुन्हा आपले बस्तान बांधलेले आहे.

पार्किंग सुविधेचा अभाव

सोसायटीला वाहन पार्किंगची सुविधा नाही. सोसायटीच्या आवारात १५ ते २० गाडय़ा उभ्या राहतील एवढी मोकळी जागा आहे. मात्र सध्या सोसायटीमध्ये २५० मोटारसायकली व १५० च्या आसपास चारचाकी गाडय़ा आहेत. या गाडय़ा उभ्या करायच्या कुठे हा सर्वासमोरच प्रश्न आहे. सोसायटीची एकूण ६३ दुकाने बाहेरच्या आवारात आहेत. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक सोसायटीच्या जागेत वाहने उभी करून जातात. शेजारील औद्योगिक वसाहतीतील कामगार तसेच परिसरातील रहिवासी येथे वाहने उभी करून बसने स्टेशनला जातात. त्यांच्यावर कुणाचाही वचक नाही. दुकानदारच त्यांना हटकत नसल्याने नागरिकांना काही करता येत नाही. सोसायटीची जागा वाहनांनी व्यापल्याने मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध राहिलेली नाही. सोसायटीची एक छोटी बाग आहे, परंतु तेथे केवळ लहान मुलेच खेळू शकतात. मोठय़ा मुलांना खेळायला तसेच नागरिकांना फिरायला येथे जागा नाही, असे सदस्य पवन मिश्रा यांनी सांगितले.

[jwplayer PuSvtqP8]