नियमबाह्य़ मातीभराव केल्याने कारवाई; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

विरार येथील शापूरजी पालनजी गृहनिर्माण प्रकल्पाने केलेल्या मातीभरावाबाबत वसई तहसीलदारांनी दंडाची नोटीस आकारली आहे. कुठल्या आधारे हा भराव केला आहे त्याचे पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकल्पासाठी केलेल्या मातीभरावामुळे तीन गावांत पावसाळय़ात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप वसई पर्यावरण समितीने केला असून हा प्रकल्पच रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. आमच्या प्रकल्पाने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केले नसून मातीभराव कायदेशीर असल्याचा दावा शापूरजी पालनजी प्रकल्पाच्या संचालकांनी केला आहे.

विरार पश्चिमेच्या बोळींज येथील भूखंडावर मुंबईच्या बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी शापूरजी पालनजी यांच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणात मातीभराव करण्यात

आलेला आहे. मात्र या मातीभरावामुळे बोळींज, नानभाट आणि नंदाखाल या तीन गावांत पावसाळय़ात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप वसई पर्यावरण समितीने केला आहे. याविरोधात समितीने आंदोलनही सुरू केले आहे, तर या भरावामुळे गावात पाणी शिरून शेती आणि घरांचे नुकसान होत आहे. दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होणार असल्याने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी समितीने पालिका आयुक्तांकडे केली आहे. या प्रकल्पासाठी गावाजवळील जमिनीवर मोठय़ा प्रमाणावर मातीभराव करण्यात आलेला आहे. पाणी जाण्याचे नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत. त्यामुळेच हे पूरपरिस्थितीचे संकट ग्रामस्थांवर आल्याचा आरोप पर्यावरण संवर्धक समितीचे अध्यक्ष समीर वर्तक यांनी केला आहे. ग्रामस्थांना उद्ध्वस्त करून हा प्रकल्प होणार असेल तर आम्ही तो होऊ  देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकल्पासाठी वसई-विरार महापालिका तसेच सर्व संबंधित शासकीय विभागाच्या परवानग्या घेतल्या असल्याचे शापूरजी पालनजी यांनी ईमेलद्वारे दिलेल्या उत्तरात कळवले आहे.

सहा महिन्यांपासून चालढकल

वसई पर्यावरण संवर्धक समितीने याबाबत तक्रार केल्यानंतर १६ मे २०१७ रोजी बोळींज येथील तलाठय़ाने या मातीभराव आणि जमिनीचा पंचनामा केला होता. मातीभराव झाला असून पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत आणि त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे या पंचनाम्यात म्हटले होते. हा पंचनामा तेव्हाच वसईच्या तहसीलदारांना सादर केला होता. तलाठय़ाने संचिका सादर केल्यानंतर तहसीलदार दंडाची नोटीस आकारतात. मात्र मागील सहा महिन्यांपासून चालढकल करण्यात येत होती. अखेर १४ डिसेंबर वसईच्या तहसीलदारांनी मातीभराव केल्याची नोटीस काढली आहे. या जागेवर १० हजार ४८२ ब्रास मातीभराव, १० ब्रास डबर आणि ८ ब्रास खाडीसाठा केल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. या भरावामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) तरतुदीनुसार कारवाई का करण्यात येऊ  नये, असे या नोटिसीत म्हटले आहे. याबाबत खुलासा आतापर्यंत गौण खनिजाची सक्षम प्राधिकाऱ्यांकडून घेतलेली परवानगी, स्वामित्व धन भरल्याची चलने, निर्गतपास इत्यादी कागदपत्रे घेऊन २० डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

‘रॉयल्टी घेऊनच मातीभराव’

बोळींज येथील या जमिनीची बिनशेती परवानगी ठाणे आाणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली आहे. त्यानुसार जागेचे बांधकाम करण्याचा परवाना वसई-विरार महापालिकेकडून मिळालेला आहे.  मातीची रॉयल्टी शासनाकडे भरली आहे, असे जॉयविले शापूरजी हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी सांगितले.

आमची कंपनी १५० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. आजवर कुठल्याच नियमांचे उल्लंघन केलेले नाही. प्रत्येक प्रकल्पात स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक परवानग्या घेऊनच हा प्रकल्प राबवत असतो. ग्राहकांच्या आणि जनतेच्या हिताचा आधी विचार असतो.

– व्यंकटेश गोपालकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी, शापूरजी पालनजी रिअल इस्टेट

हा मातीभराव कायदेशीर की बेकायदा त्याच्याशी आम्हाला घेणे-देणे नाही. या भरावामुळे आमचे गाव उद्ध्वस्त होत आहे. आम्ही हा प्रकल्प होऊ  देणार नाही.

– समीर वर्तक, अध्यक्ष, वसई पर्यावरण संवर्धक समिती

शापूरजी पालनजी कंपनीला नोटीस आकारली आहे. त्यांच्याकडील पावत्या तपासल्या जातील. जरी भराव कायदेशीर असला आणि नैसर्गिक नाले बंद केल्याचे आढळले तर नव्याने पाहणी करून कारवाई करण्यात येईल

– किरण सुरवसे, तहसीलदार, वसई

आधी आम्ही नोटीस बजावतो. त्यानंतर त्यांनी कुणाकडून परवानगी घेतली, स्वामित्व धनाच्या पावत्या घेतल्या का ते तपासल्या जातील. जर ते नसतील तर दंडात्मक कारवाई केली जाईल. हा दंड सुमारे अडीच कोटी रुपयांच्या आसपास आहे.

– स्मिता गुरव, निवासी नायब तहसीलदार