ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वसंत डावखरे विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांत पुन्हा एकदा आव्हाडांचीच सरशी झाली आहे. शिवसेनेसोबत वर्षांनुवर्षे मैत्रीचा ‘वसंत’ फुलवत स्वपक्षाच्या वाढीत आडकाठी आणणाऱ्या डावखरेंच्या समर्थकांना डावलून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहराचे अध्यक्षपद आव्हाडसमर्थक नजीब मुल्ला यांच्याकडे सोपवल्याने डावखरे गटाला आणखी धक्का बसला आहे. शहर अध्यक्ष निवडीसंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत डावखरेसमर्थकांनी आव्हाडांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडून आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, हे आरोप डावलून पवारांनी मुल्ला यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली. त्यामुळे पक्षातील मतभेद चव्हाटय़ावर येऊ लागले असून डावखरेसमर्थक संजय भोईर यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास साफ नकार दिला आहे.
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे प्रस्थ गेल्या काही वर्षांत वाढले आहे. काही वर्षांपूर्वी पक्षाचे शहर अध्यक्षपद आव्हाडांकडे होते. त्यांना प्रदेश पातळीवर आणण्यात आल्याने आव्हाडांचे कट्टर समर्थक मनोज प्रधान यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु, प्रधान यांच्या कार्यपद्धतीवर चहुबाजूंनी नाराजी व्यक्त होऊ लागली. त्यामुळे प्रधान यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड होताच त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. तेव्हापासून गेले सहा महिने राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्षपद रिक्त होते.
महापालिका निवडणुका १८-२० महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना शहर अध्यक्षपदासाठी डावखरे आणि आव्हाड यांच्या गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. डावखरे यांचे पुत्र निरंजन, पक्षाचे ज्येष्ठ नेते देवराम भोईर यांचे नगरसेवक पुत्र संजय भोईर यांना डावखरे गटाकडून अध्यक्षपदासाठी पुढे केले जात होते. तर आव्हाड गटाकडूनही इच्छुकांची नावे पुढे केली जात होती. या पाश्र्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वखाली ठाण्यातील नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीतही मनोज प्रधान आणि हणमंत जगदाळे या दोन नेत्यांविरोधात डावखरे समर्थकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. प्रधान यांनी पदवाटपासाठी पैसे घेतल्याचा आरोपही डावखरे यांचे समर्थक नगरसेवक योगेश जानकर यांनी केला. ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ यांनीही आव्हाडसमर्थकांवर हल्लाबोल केला. त्यामुळे आव्हाड गटाची कोंडी झाली होती.
मात्र, असे असतानाही पवारांनी अखेर आव्हाड यांचे समर्थक नजीब मुल्ला यांचीच निवड केली. त्यामुळे वसंत डावखरे यांना मोठा धक्का बसला आहे. मुल्ला यांच्या निवडीमुळे नाराज झालेले संजय भोईर यांनी पक्षाचे कार्याध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते. या प्रकरणी वसंत आणि निरंजन या डावखरे पिता-पुत्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता. तर ‘पक्षात कोणतेही गट-तट नाहीत, हे तुमच्या मनाचे खेळ आहेत’, अशी प्रतिक्रिया नजीब मुल्ला यांनी दिली.