तळोजा ते काटई नाका रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव; सल्लागार नियुक्तीला सुरुवात

ठाणे : कल्याण, अंबरनाथहून ठाणे किंवा मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना कल्याण-शीळ-तळोजा मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. या पाश्र्वभूमीवर  नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक पट्टय़ापासून अंबरनाथ-काटई या १४ किलोमीटरच्या रस्त्याने रुंदीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. या रुंदीकरणामुळे कल्याण, अंबरनाथ येथून ठाणे किंवा मुंबई गाठणाऱ्यांना शीळफाटा रस्त्याला बगल देता येणार आहे.

कल्याणहून ठाणे, मुंबई गाठण्यासाठी शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवास करण्याशिवाय सध्या तरी प्रवाशांकडे पर्याय नाही. गेल्या काही वर्षांत कल्याण-शीळ-तळोजा मार्गावरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी प्रवाशांना शीळ फाटा मार्गावर तासन्तास ताटकळावे लागते.

कल्याण-शीळ रस्त्याच्या रुंदीकरणाचा तसेच उन्नत मार्गाचा प्रस्तावही शासनाने मंजूर केला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ठाणे-बेलापूर मार्गावरून काटईपर्यंत थेट मार्ग उभारण्याच्या निविदाही काढल्या आहेत.  त्यातच आता तळोजा औद्योगिक पट्टय़ातून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंबरनाथजवळील खोणीमार्गे तळोजा हा मार्ग अधिक सोयीचा आहे. मात्र, या रस्त्याची रुंदी कमी असल्याने या ठिकाणी मोठी वाहन कोंडी होते. त्यामुळे या जुन्या  रस्त्याचे रुपडे पालटण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. येत्या वर्षभरात हा रस्ता ३० मीटर रुंद केला जाईल, अशी माहिती एमएमआरडीएमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यासाठी आवश्यक जागाही उपलब्ध असून इतर जागाही संपादित केली जाईल. १४ किमीच्या या रस्त्याच्या रुंदीकरणातून शीळ फाटामार्गे जाणारी वाहतूक टाळता येणार आहे. तसेच अंबरनाथ औद्य्ोगिक वसाहतीतून शीळमार्गे तळोजाला जाणारी वाहतूकही वळवता येणार आहे.  नुकतीच यासाठी सल्लागार नेमण्याची

निविदा काढण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत सल्लागाराची नेमणूक करून पुढील दोन महिन्यांत रुंदीकरणाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

कल्याण विकास केंद्रालाही फायदा

एमएमआरडीएच्या माध्यमातून विस्तारित कल्याणमध्ये उभारण्यात येणाऱ्या कल्याण ग्रोथ सेंटरसाठीही हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे. तसेच येथे सध्या मोठय़ा प्रमाणावर रहिवासी संकुले उभारली जात आहेत. त्यामुळेही या रस्त्याचे महत्त्व येत्या काळात वाढणार आहे. राज्य सरकारच्या स्वस्त घर योजनांचे प्रकल्पही याच पट्टय़ात उभे रहात आहेत.