बुलेट ट्रेनमुळे प्रकल्प गुंडाळल्याची चर्चा; पर्यायांवर विचार सुरू

कल्याण ते शीळ-महापे मार्गावर रोज होणारी कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या मार्गावर आखलेल्या उड्डाणपुलाचा प्रकल्प बुलेट ट्रेनच्या नियोजित मार्गामुळे रद्द होण्याची चिन्हे आहेत. या उड्डाणपुलाऐवजी आता भुयारी मार्ग किंवा अन्य पर्यायांची चाचपणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केली आहे. महिनाभरात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाने आखलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भुयारी मार्ग नवी मुंबईतील महापेतून शीळमार्गे म्हातर्डी गावाच्या दिशेने जात आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) याच भागात आखलेल्या प्रकल्पांचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात शीळ-कल्याण मार्गावरील नियोजित उड्डाणपूल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उड्डाणपुलाऐवजी अन्य पर्यायांची चाचपणी एमएमआरडीएने सुरू केली आहे. ठाणे महापालिकेनेही यासंबंधी एमएमआरडीएशी चर्चा सुरू केली आहे. या भागात भुयारी मार्गाची आखणी करताना महापालिका हद्दीतील दिवा परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांची जोडणी कशी करता येईल याचाही अंदाज घेण्यात येत आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातील अवजड वाहने शीळफाटा मार्गे मुंबई, ठाणे, गुजरात, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने जातात. या वाहनांचा आकडा मोठा असून त्या तुलनेत शीळ रस्ता अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंब्रा वाय जंक्शन आणि कल्याणफाटा या दोन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, हा रस्ता अरुंद असल्यामुळे तिथे पुलांची उभारणी करणे शक्य नव्हते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला असून या कामात अडसर ठरणारी बांधकामे हटविण्याची कारवाई महापालिकेने बुधवारपासून सुरू केली आहे. या कामांमुळे दोन्ही उड्डाणपुलांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र असतानाच बुलेट ट्रेनच्या मार्गामुळे कल्याणफाटा येथील उड्डाणपूल रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

असा होता उड्डाणपूल

* कल्याण आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणारे रस्ते शीळ मार्गाला मिळतात. या मार्गाना जोडणाऱ्या कल्याणफाटा आणि शीळफाटा चौकांत प्रचंड कोंडी होते. त्यामुळे शीळफाटा ते कल्याणफाटा असा उड्डाणपूल उभारण्यात येणार होता.

* १६०० मीटर लांबीच्या पुलावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन पदरी मार्गिका तयार करण्यात येणार होत्या. या पुलाच्या कामासाठी सुमारे १८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते.

*  जेएनपीटी बंदरातून येणारी अवजड वाहने पुलावरून सरळ मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर जातील अशी या  पुलाची रचना करण्यात येणार होती. मात्र, या पुलाजवळून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असल्याचे राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाने एमएमआरडीएला पत्राद्वारे कळविले आहे.

बुलेट ट्रेनच्या मार्गामुळे कल्याणफाटा येथे उड्डाणपूल बांधणे शक्य नसल्याने भुयारी मार्ग किंवा अन्य पर्यायांवर विचार सुरू आहे. एमएमआरडीए महिनाभरात निर्णय घेईल. काही पर्याय महापालिकेने एमएमआरडीएपुढे ठेवले आहेत. ठाणे महापालिका हद्दीचा भाग असलेल्या दिवा तसेच शीळ परिसरातील अंतर्गत रस्त्यांची जोडणी या मोठय़ा प्रकल्पांशी कशा प्रकारे करता येईल याचाही विचार सुरू आहे.

– संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महापालिका