बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राला ठाण्यातील जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. २४ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह तीन जणांना सत्र न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे.  शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राविरोधात २४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात २६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली या भागीदारांचाही आरोपींमध्ये समावेश होता. या पाचही भागीदारांना पोलीस निरीक्षक व्ही. के. देशमुख यांनी नोटीस बजावून पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यामुळे शिल्पा शेट्टी आणि तिचा पती अडचणीत आले होते.

अटक टाळण्यासाठी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य तिघांनी तात्काळ ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी धाव घेतली होती. त्यानुसार, न्यायालयाने १७ मे पर्यंत या पाचहीजणांना अटक करू नये, असे आदेश देत प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरीम जामीन मंजूर केला आहे. मात्र, पुढील सुनावणीत ठाणे न्यायालयाने जामीन रद्द केल्यास या सर्वांना पुन्हा अटक होऊ शकते. त्यामुळे शिल्पा शेट्टीवर अजूनही अटकेची टांगती तलवार कायम आहे. ठाणे जिल्हासत्र न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केल्याने त्या आदेशाची प्रत घेवून उद्योगपती राज कुंद्रा हे तीन भागीदारासह बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हजर झाले होते. मात्र सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी शुटींगच्या व्यस्त कामामुळे पोलीस ठाण्यात हजर राहू शकली नाही असे सांगण्यात आले. यावेळी राज कुंद्रा हे सुरक्षेसाठी १० बाऊंसर तर कायदेशीर बाजू मांडण्यासाठी ४ वकिलांसोबत पोलीस ठाण्यात आले होते. कोनगाव पोलिसांनी राज कुंद्रासह त्याच्या भागीदारांची एसी खोलीत २ तास कसून चौकशी केली.

पोलीस ठाण्याबाहेर राज कुंद्रा यांनी पत्रकारांना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. या अपहार प्रकरणात आम्हाला विनाकारण गोवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. रवि भालोटिया यांच्याकडे कंपनीचे ८ लाख रुपये बाकी असल्याचा आरोप त्यांनी केला. शिल्पा शेट्टी व उद्योगपती राज कुंद्रा या दाम्पत्याने बेस्ट डील कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात देशभरातील अनेक व्यापाऱ्यांना फसवले असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांनी व्यापाऱ्यांना सुमारे १८ कोटी रुपयांनी गंडा घातल्याचा संशय आहे. पोलीस चौकशीत खरी माहिती बाहेर येईल अशी प्रतिक्रिया तक्रारदार रवि भालोटिया यांनी दिली आहे.