ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी अडचणीत आली आहे. शिल्पासह तिचा पती राज कुंद्रा आणि त्यांच्या तीन साथीदारांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी कोनगाव येथील व्यापाऱ्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. यापूर्वी राज कुंद्रा यांनी पोलीस ठाण्यातून अंतरिम जामीन मिळवला होता. शुक्रवारी या प्रकरणी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांचे साथीदार ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले. फसवणूक प्रकरणातील आरोपासंदर्भात ठाणे न्यायालयात आज सुनावणी झाली. सत्र न्यायालय उद्या या प्रकरणाचा निकाल देणार असल्याचे शिल्पाच्या वकिलांनी सांगितले.

बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या माध्यमातून विविध कंपनीचे प्रोडक्ट विक्रीचा ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसाय उद्योगपती राज कुंद्रा यांनी पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावाने सुरु केला होता. व्यवसायात नफा व्हावा, यासाठी रवी मोहनलाल भालेरीया या व्यापाऱ्याने बेस्ट डील टीव्ही कंपनी मार्फत ५ कोटी रुपयांच्या बेडशीटची ऑर्डर घेतली होती. या व्यवहारात २३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे, असा आरोप भालेरीया यांनी केला होता. याप्रकरणी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आज ठाणे सत्र न्यायालयात शिल्पा शेट्टी व फिर्यादीच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला. या युक्तिवादानंतर ठाणे न्यायालयात जामीनावर सुनावणी झाली असून उद्या याप्रकरणाचा निकाल देण्यात येणार आहे, अशी माहिती शिल्पाच्या वकिलांनी दिली.