26 February 2021

News Flash

शीळफाटा-भिवंडी रस्ता रुंदीकरणाला मुहूर्त

शीळ ते कल्याण मार्गावरील वाहतुकीत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे.

एमएमआरडीएकडून १९५ कोटींची निविदा; वर्षभरात काम पूर्ण करण्याचा दावा

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने(एमएमआरडीए) आखलेल्या प्रस्तावित उन्नत मार्गामुळे संभ्रमाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बहुचर्चित शीळफाटा ते भिवंडी रस्त्याच्या रुंदीकरणास लवकरच मुहूर्त मिळेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शीळ, डोंबिवली, कल्याण, कोण, भिवंडी या मार्गावर दररोज होणारी वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने या २० किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तब्बल १९५ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या प्रक्रियेनंतर वर्षभरात रुंदीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, असा दावा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

शीळ ते कल्याण मार्गावरील वाहतुकीत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. कल्याण, डोंबिवली ते नवी मुंबई या मार्गावरील प्रवासी वाहतूकही वाढली आहे. तसेच उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक तळोजा-शीळफाटा-मुंब्रा वळण रस्त्यामार्गे होत असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत शीळ-महापे आणि कल्याण या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली असून ही कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकार स्तरावर विविध प्रकल्पांची आखणी केली जात आहे.

शीळफाटा ते कल्याण आणि भिवंडीपर्यंतची वाहतूक कोंडीविरहित व्हावी यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच तयार केला आहे. सद्य:स्थितीत हा मार्ग चार पदरी असून महामंडळाने तो सहा पदरी करावा, असा प्रस्ताव तयार केला आहे. असे असले तरी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ठाणे-बेलापूर मार्गापासून काटई नाक्यापर्यत उन्नत मार्गाची आखणी केल्याने शीळफाटा येथून सहा पदरी रस्त्याचा प्रकल्प आखला जावा का याविषयी एमएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळातील अभियंत्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू होती. या चर्चेतून अखेर मार्ग निघाला असून एमएमआरडीएने आखलेला मार्ग उन्नत असल्याने त्याखाली असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हे दोन्ही मार्ग एकमेकांना पूरक ठरू शकतील, असे राज्य सरकारचे मत आहे. त्यामुळे आठवडाभरापूर्वी शीळफाटा ते भिवंडी या मार्गाच्या रुंदीकरणासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. २० किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पासाठी १९५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून शीळफाटा, डोंबिवली, पत्रीपूल, कल्याणमधील शिवाजी चौक, कोन ते भिवंडी हा संपूर्ण रस्ता सहापदरी केला जाणार आहे. दरम्यान, या मार्गादरम्यान असलेल्या दुर्गाडी येथील कोनगावाजवळ उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्तावही रस्ते विकास महामंडळामार्फत तयार केला जात आहे. त्यामुळे या भागातील महत्त्वाचा अडथळा दूर होऊ शकेल, असा दावाही शिंदे यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 3:27 am

Web Title: shilphata bhiwandi road winding work mmrda tmc
Next Stories
1 कोंडीवर पुलाचा उतारा नाहीच!
2 आजी-आजोबांच्या पाठी दप्तर
3 शहरबात ठाणे : सांस्कृतिक महोत्सवांचे दिवस
Just Now!
X