श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित ‘आर्ट फेस्टिव्हल’मध्ये तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल

अंबरनाथ: संगीत, चित्रकला, शिल्पकला, व्यंगचित्रे आणि खाद्य संस्कृतीच्या अनोख्या मिलाफामुळे गेल्या पाच वर्षांपासून रसिकांचे आकर्षण केंद्र बनलेला शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलला आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित हा महोत्सव तीन दिवस सुरू राहणार असून त्यात वैशाली सामंत यांच्यासह सूरसाम्राज्य कार्यक्रमात गायक-गायिका स्वरांची मैफल सादर करणार आहेत. त्यासह दिव्या कुमार, अनुषा मनी आणि प्रसिद्ध पाश्र्वगायक जुबीन नौटीयाल हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे.

अंबरनाथच्या प्रसिद्ध शिव मंदिराच्या शेजारच्या मैदानात २८ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘सूरसाम्राज्य’ या मराठी गीतांच्या कार्यक्रमात प्रसिद्ध पाश्र्वगायिका वैशाली सामंत, नागेश मोर्वेकर, कविता राम यांच्यासह ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाद्वारे घराघरांत पोहोचलेले अक्षया अय्यर, विश्वजीत बोरवनकर, अक्षता सावंत, राजू नदाफ, प्रसेनजीत कोसंबी आणि हर्षद नायबळ हे या कार्यक्रमात सहभागी होतील.

शनिवारी, २९ फेब्रुवारी रोजी संगीत क्षेत्रात नव्या वाट चोखाळणाऱ्या दिव्या कुमार आणि अनुषा मनी या गायकांना ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. तर १ मार्च रोजी प्रसिद्ध पाश्र्वगायक, संगीतकार आणि तरुणाईला वेड लावणाऱ्या जुबीन नौटीयाल यांचा ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ कार्यक्रम होणार आहे. यासह चित्र, माईम, मेणाचे पुतळे आणि विंटेज गाडय़ांचे प्रदर्शन हे फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. सलग तीन दिवस सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

मेणाच्या पुतळ्यांचे प्रदर्शन, मुद्राभिनय आणि मुंबईचे खाद्य

संगीत आणि चित्रांसोबतच मेणाच्या पुतळ्यांचे प्रदर्शन या फेस्टिव्हलचे खास आकर्षण ठरणार आहे. देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, राजकारणी, खेळाडू, प्रसिद्ध व्यक्तींचे हुबेहूब मेणाचे पुतळे येथे पाहता येणार आहे. त्यासोबतच मुद्राभिनय अर्थात माइम कलाही पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

विविध चित्रसंस्कृतीचा संगम

देशातील प्रसिद्ध चित्रकारांची चित्र आणि त्यांची प्रत्यक्ष भेट या फेस्टिवलच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. देशाच्या विविध राज्यांतील आणि महाराष्ट्रातील स्थानिक चित्रकारांच्या चित्रसंस्कृतीचा संगम येथे पाहायला मिळेल. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास उलगडणारी दुर्मीळ छायाचित्रेही या ठिकाणी पाहता येईल.

विविध राज्यातील चित्रकार, संगीत क्षेत्रातील दिग्गज, मेणाच्या पुतळ्याचे प्रदर्शन आणि माइमसारखी कला एकाच ठिकाणी रसिकांना पाहता येणार आहे. त्यामुळे यंदाचा शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल एका वेगळ्याच उंचीवर जाणार आहे. विंटेज गाडय़ांचे प्रदर्शनही वेगळे आकर्षण असणार आहे. 

– डॉ. श्रीकांत शिंदे खासदार,कल्याण लोकसभा.