05 August 2020

News Flash

मटण दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

वसईत काही मटण विक्रेते बोकडाऐवजी मेंढय़ाचे मटण देऊन ग्राहकांची फसवणूक करतात.

(संग्रहित छायाचित्र)

विक्रेते दरवाढीवर ठाम; दुकाने बंद करण्याचा इशारा

वसई : मटणाच्या दरवाढीवरून वसईतील शिवसैनिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असतानाच दुसरीकडे, दुकाने बंद करू; पण मटण दरवाढ मागे घेतली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मटण व्यावसायिकांनी दिल्याने येत्या काही दिवसांत मटण दरवाढीवरून वसईत वाद आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत.

वसईत मटणाचे भाव गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वीच ४६० रुपये किलो असलेला मटणाचा दर आता अचानक ५६० रुपये झाला असून वसईत काही ठिकाणी ग्राहकांकडून किलोमागे ५८० रुपये उकळले जात आहेत. याविरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे प्रथमेश राऊत यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मटण भाववाढ आटोक्यात ठेवण्याची मागणी केली आहे. वसईत काही मटण विक्रेते बोकडाऐवजी मेंढय़ाचे मटण देऊन ग्राहकांची फसवणूक करतात. बोकडाला लसीकरण करणे गरजेचे असताना वसईतील मटण विक्रेते ते करत नाहीत, असेही राऊत यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणले आहे. मटणाची अवाजवी भाववाढ आणि मटणविक्रेत्यांकडून ग्राहकांची होत असलेली फसवणूक यास आळा न घातल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

दुसरीकडे, पालघर जिल्ह्यातील मटण व्यावसायिकांनी एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीत मटणाची दरवाढ मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मटण व्यावसायिकांची शनिवारी वसईच्या निर्मळ येथे सभा झाली. यावेळी दुकाने कायमची बंद करू पण मटणाची दरवाढ मागे घेतली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जितेंद्र कोथमिरे यांनी दिली. मटणाची दरवाढ का झाली, याची कोणतीही शहानिशा शिवसेनेने केलेली नाही, अशी खंतही मटण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. पूर्वी एका बोकडाच्या चामडय़ाला ३०० रुपये भाव मिळायचा, तो आता अवघ्या दहा रुपयांवर आला आहे. मटण व्यावसायिक ज्या बाजारांतून बोकड खरेदी करतात, त्याच बाजारांतून एक कंपनी बोकड खरेदी करून दिवसाकाठी दहा हजार बोकडांची आखाती देशात निर्यात करते. त्यामुळे आपल्याकडील बाजारात बोकडांची कमतरता निर्माण झाली आहे. अशा अनेक अडचणी मटण व्यावसायिकांना भेडसावत असताना शिवसेना मटण दरवाढीवरून आततायी भूमिका घेत असल्याचे मटण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

खाटीक समाज नुकसानीमध्ये व्यवसाय करत आहे. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले असताना फक्त मटणाचे भाव वाढू नयेत ही अपेक्षा अयोग्य आहे. शिवसेनेने आततायी भूमिका न घेता भूमिपुत्र खाटीक समाजाशी चर्चा करून वस्तुस्थिती समजून घ्यावी.’

 – कॅप्टन नीलेश पेंढारी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संस्था

वसईच्या विविध बाजारांत मटणाचे भाव वेगवेगळे आहेत. या भावांमध्ये समतोल असावयास हवा. शिवाय काही ठिकाणी मेंढय़ाचे मटण बोकडाच्या मटणाच्या भावाने विकले जाते. ही फसवणूक बंद झालीच पाहिजे.

-प्रथमेश राऊत, शिवसेना पदाधिकारी, वसई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 2:44 am

Web Title: shiv sena aggressive against mutton price rise zws 70
Next Stories
1 वसईचे समाजरंग : घरांची रचना, पारंपरिक वापरातील वस्तू
2 मेट्रोसाठी पूल पाडणार?
3 बदलापुरात महाविकास आघाडीतच खेचाखेच?
Just Now!
X