ठाणे : येथील कोलशेत, हायलँड आणि माजिवडा परिसरातील तीन जलकुंभांमध्ये पाणी भरण्यासाठी अधिक क्षमतेचे पंप बसविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. या कामामुळे आसपासच्या परिसरातील गृहसंकुलांमध्ये भेडसावणारी पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, या कामावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.

हायलँड, कोलशेत रोड, माजिवडा या भागातील तीन जलकुंभांमध्ये पाणी भरण्यासाठी अधिक क्षमतेचे पंप नव्हते. यामुळे या जलकुंभांमध्ये पुरेसा पाणीसाठा होत नव्हता. त्याचा परिणाम परिसरातील गृहसंकुलांमधील पाणीपुरवठय़ावर होत असून यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने ४ कोटी ८९ लाख रुपये खर्चून पाच नवीन अधिक क्षमतेचे पंप खरेदी केले आहेत. तसेच हे पंप बसविण्याचे कामही पालिकेने हाती घेतले असून येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या कामासाठी सतत पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे.  लोक चळवळीतून हे शक्य झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी या कामासाठी संबंधित विभागासह सर्वसाधारण सभेत पाठपुरावा केल्याचा दावा करत महापालिका आणि नगरसेवक निधीतून ही कामे करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच बाळकुम येथील दोस्ती एम्पेरिया, बायर इंडिया येथील कल्पतरू, कोलशेत येथील लोढा अमारा येथे आमच्या पाठपुराव्याने नवीन तीन जलकुंभ बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे म्हटले आहे.