महापौर स्पर्धेच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

ठाणे महापालिका निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सत्ताधारी शिवसेनेने यासाठी महापौर मॅरेथॉन स्पर्धेचा आधार घेतला असून स्पर्धेच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही मॅरेथॉन कळवा, खारेगाव, मुंब्रा परिसरातून जाणार आहे. दर वर्षी पावसाळ्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या मार्गातून कळवा, मुंब््रयाला वगळण्यात येत असल्याने तेथील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. ही नाराजी दूर करण्यासाठी यंदा मॅरेथॉनच्या मार्गात आणखी एका मार्गाची भर टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या परिसरातील मतदारांना आपल्याकडे खेचण्याचेही प्रयत्न सेनेने चालवले आहेत.

कळवा, मुंब्रा, दिवा ही ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणारी उपनगरे असली तरी पालिकेमार्फत याठिकाणी मोठय़ा कार्यक्रमांचे वा स्पर्धाचे आयोजन क्वचितच करण्यात येते. तोच प्रकार ठाणे महापौर मॅरेथॉनच्या बाबतीत घडत होता. गेल्या २७ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला क्रीडाक्षेत्रात वेगळे वलय आहे; परंतु ही स्पर्धा केवळ ठाणे शहरापुरती मर्यादित होती. वर्षां मॅरेथॉन कळवा तसेच खारेगाव येथे आयोजित केली जात नसल्याने या मुद्दय़ावर काही वर्षांपासून सातत्याने राजकारण रंगत आले आहे. कळवा-मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेकडून कळव्यावर अन्याय होत असल्याची टीकाही यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते करत होते. या पाश्र्वभूमीवर यंदा कळवा आणि खारेगावातही ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय महापौर संजय मोरे यांनी घेतला आहे. या स्पर्धेचा मार्ग ठाणे शहर, वागळे तसेच घोडबंदर असा असतो. यंदा मात्र खारेगाव-कळवा-कोपरीमार्गे महापालिका मुख्यालय अशी दहा किलोमीटर अंतराची विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे गेल्या २७ वर्षांनंतर प्रथमच महापालिकेच्या स्पर्धेत कळव्यात मॅरेथॉनपटू धावणार आहेत.

वरकरणी हा प्रशासकीय निर्णय दिसत असला तरी, यामागे मतांची गोळाबेरीजही करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कळवा, मुंब्रा परिसरातील आपले संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मॅरेथॉन कळवा, खारेगावमध्ये नेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. या निमित्ताने या परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचे तसेच त्यांना आपल्याकडे खेचण्याचे सेनेचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.

कळवा-मुंब््रयात यापूर्वी ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन झालेली नाही. महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक जवळ आली आहेत. तसेच कळवा-मुंब््रयात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धा घेण्याची खेळी शिवसेनेनी खेळली असावी.

मंदार केणी, राष्ट्रवादी युवक कॉँगेस, ठाणे शहराध्यक्ष