News Flash

युतीच्या आशा संपुष्टात? कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपवर थेट हल्ला

नगरसेवक फोडण्यासाठी भाजपकडून पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली.

शिवसेनेने भाजपवर केलेल्या थेट आरोपांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत युती फिस्कटल्यात जमा असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून युतीमधील जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच गुरुवारी रात्री शिवसेनेने भाजपवर थेट निशाणा साधत आपल्या पक्षाचे नगरसेवक फोडण्यासाठी भाजपकडून पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली. राज्य सरकार युतीचे असताना मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या पोलीस दलास हाताशी धरून शिवसेनेच्या नगरसेवकांना धमकाविले जात असून त्यांना पैशाची आमिषे दाखविली जात असल्याचा आरोपही शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना केला. शिवसेनेने भाजपवर केलेल्या या थेट आरोपांमुळे या निवडणुकीत युती फिस्कटल्यात जमा असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून शिवसेना-भाजपची एकत्रित सत्ता असली तरी यंदाच्या निवडणुकीत युती करायची नाही, असा सूर अगदी सुरुवातीपासून भाजपच्या वर्तुळात व्यक्त केला जात होता. डोंबिवलीलगत असलेली २७ गावे वगळून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची मोठी कोंडी केलीच, शिवाय विकास परिषदेच्या निमित्ताने भाजपच्या व्यासपीठावरून ६५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करीत शिवसेनेला आणखी एक धक्का दिला. भाजपची रणनीती स्पष्ट दिसत असूनही युती व्हावी यासाठी शिवसेना नेते इतके दिवस भाजपच्या स्थानिक नेत्यांची मनधरणी करताना दिसत होते. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडे भाजपने या निवडणुकीची सूत्रे सोपवली असून त्यांना हाताशी धरून युती व्हावी यासाठी शिवसेना नेते प्रयत्नशील असल्याचे चित्रही पुढे आले होते. मात्र, जागावाटपाच्या अवास्तव मागण्या दोन्ही पक्षांकडून होत असल्याने युतीच्या चर्चेत अर्थ नसल्याचेही स्पष्ट होऊ लागले होते.
दरम्यान, मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्यास सज्ज राहा, असा स्पष्ट संदेश स्थानिक नेत्यांना दिल्याने युती होण्याच्या आशा मंदावल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी भाजपवर थेट निशाणा साधत आमचे नगरसेवक फोडण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप लांडगे यांनी केल्याने युतीची उरलीसुरली आशाही संपुष्टात आल्याचे चित्र पुढे आले आहे.

कल्याणातील नगरसेवक मल्लेश शेट्टी तसेच अन्य चार नगरसेवकांना पोलीस बळाचा धाक दाखविला जात असून यामध्ये डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण आघाडीवर आहेत, वेगळे लढायला आम्हीही तयार आहोत, मात्र अशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरेल.
– गोपाळ लांडगे, कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख

शिवसेनेच्या नगरसेवकांना पोलीस बळाचा धाक दाखवला जात आहे, या आरोपात तथ्य नाही. त्यांच्या नगरसेवकांना खरोखरच कोणी धमकावत असेल तर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्याऐवजी पोलिसांत तक्रार दाखल करावी.
– कपिल पाटील, भाजप खासदार

मुख्यमंत्री शिवसेनेपुढे शरण ; काँग्रेसचा आरोप
मुंबई: पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम शिवसेनेमुळे रद्द करावा लागला. गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे अपयश असून, मुख्यमंत्री शिवसेनेपुढे झुकल्याचे चित्र समोर येते, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. कार्यक्रमाला विरोध म्हणजे शिवसेनेची देशभक्ती नसून ते सोयीचे राजकारण असल्याची टीका निरुपम यांनी केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांनी पाठविलेल्या परिपत्रकातील भाषेवरून मुंबई पोलीस हे रा. स्व. संघ आणि भाजपची भाषा बोलत असल्याचे सिद्ध होते, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2015 2:50 am

Web Title: shiv sena bjp alliance break in kdmc poll
Next Stories
1 सोनसाखळी चोरांची भीती नको, आम्ही समर्थ आहोत!
2 पारंपारिक बालेकिल्ल्यात भाजपचा उलटा प्रवास
3 चौकांचा चक्रव्यूह
Just Now!
X