News Flash

उल्हासनगर पालिकेसाठी युतीची चर्चा निष्फळ

गेल्या काही दिवसात केंद्र आणि राज्य स्तरावर शिवसेना आणि भाजपात अनेक विषयांवरून वाद सुरू आहेत.

आचारसंहितेपूर्वी अंतिम निर्णयाची शक्यता

येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीची शक्यता धूसर असतानाही उल्हासनगरमध्ये मात्र त्यादृष्टीने चाचपणी सुरू झाली असल्याचे दिसते आहे. नुकतीच शहरातील शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत एक बैठक बोलावली होती. मात्र त्याबैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.

गेल्या काही दिवसात केंद्र आणि राज्य स्तरावर शिवसेना आणि भाजपात अनेक विषयांवरून वाद सुरू आहेत. मानापमान नाटय़, नोटाबंदीविरोधात शिवसेनेने केलेली टीका, अशा घटनांमुळे आगामी महापालिका निवडणुकांत युतीची शक्यता धूसर झाली आहे. मात्र तरीही उल्हासनगर महापालिकेत शिवसेना भाजप आणि रिपाई महायुतीची चाचपणी सुरू केल्याचे दिसते आहे. नुकतीच उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजपच्या शहरातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यात प्रभागवार पक्षाची ताकद कशी आहे, याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप शहर अध्यक्ष कुमार आयलानी, शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपचे नरेंद्र राजानी, नगरसेवक प्रकाश माखिजा, सभागृह नेता धनंजय बोडारे, भाजप महासचिव राजा गेमनानी आणि दोन्ही पक्षांचे प्रमुख नगरसेवक उपस्थित होते. येत्या काही दिवसात निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वी या चर्चा पूर्ण होऊन निर्णय होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच समाधानकारक चर्चा झाली तरच युतीचा निर्णय घेण्यात येईल, असेही मत नेते व्यक्त करत आहेत.

भाजपची रिपाइंसोबत जाण्याची तयारी

शिवसेना आणि रिपाइंसोबत युतीची चर्चा करण्यासोबत भाजपने रिपाइंसोबत वेगळी चर्चा करण्याचीही तयारी दाखवली असून शिवसेनेसोबत चर्चा फिस्कटल्यास मोठी मतदार संख्या असलेल्या रिपब्लिकन मतदारांना दूर ठेवून चालणार नसल्याचे संकेत भाजपने दिले आहेत. त्यामुळे युती होणार की नाही हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजप वेगळे लढल्याने राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. तसाच फायदा पालिका निवडणुकीतही होऊ  नये, यासाठी युती करणे गरजेचे असल्याचे दोन्ही पक्षांचे काही नेते सांगतात. त्यामुळे युती होणेच फायदेशीर ठरणार असल्याचेही नेत्यांनी मान्य केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 2:36 am

Web Title: shiv sena bjp alliance possiblity arise in upcoming ulhasnagar municipal elections
Next Stories
1 पालिका निवडणुकांची पूर्वतयारी सुरू
2 लोकमान्यनगरमधील आगीत गादीचे दुकान खाक
3 कॉलेजच्या कट्टय़ावर : जोशी-बेडेकरमध्ये ‘गंधर्व’ची जोरात तयारी
Just Now!
X