बदलापुरात शिवसेना-भाजपमधील अंतर्गत लढाईने आता टोक गाठले असून या कुरघोडीनाटय़ाचा नवा अंक नुकताच पाहावयास मिळाला. शहरातून जाणाऱ्या एका रस्त्याचे भूमिपूजन या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे केले. शिवसेनेने भूमिपूजन केल्यानंतर महिनाभरात भाजपने त्याच रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी थेट केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाऊ चौधरी यांना शहरात बोलविले.
बदलापूर शहरातून कल्याण-कर्जत रस्त्याचा एक भाग असलेला फॉरेस्ट नाका ते खरवई, गांधी चौक, होप इंडिया आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन नोव्हेंबर महिन्यात फॉरेस्ट नाका येथे शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर, बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे, अंबरनाथच्या नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे तसेच एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उरकण्यात आले. यामुळे भाजपने सोमवारी सायंकाळी बदलापुरातील गांधी चौक येथे या रस्त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना पाचारण करण्यात आले होते.
या वेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचा थेट उल्लेख टाळून टीकास्त्र सोडले. ‘एका पक्षाला कोणतेही विकासकाम दिसले की शुभारंभ सोहळा उरकून छायाचित्र काढण्याची जणू सवयच झाली आहे’, अशी टीका गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी केली. या वेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाऊ चौधरी यांनीदेखील माध्यमांशी बोलताना ‘आप कागज देखिए’ असे मार्मिक उत्तर दिले. त्यामुळे सेनेचे भूमिपूजन झाल्यानंतर भाजपने त्याच रस्त्याचे काही प्रमाणात काम पूर्ण झाल्यावर पुन्हा भूमिपूजन करून शिवसेनेवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.

तो सोहळा बेकायदा?
भाजपने केलेले हे भूमिपूजन अधिकृत असल्याचे जाहीर करीत ‘तो’ सोहळा बेकायदा असल्याचे राम पातकर यांनी अप्रत्यक्षरीत्या सूचित केले.