अंतिम यादीला ‘कुंपणा’वरच्या नेत्यांची प्रतीक्षा; यादीच्या चर्चेने सेना नेतेही सावध

ठाण्यात अनेक वर्षे शिवसेनेसोबत सत्तेत राहूनदेखील स्थानिक पातळीवर स्वत:ची ‘फौज’ तयार करण्यात अपयशी ठरलेल्या भाजपने महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेतील नाराजांचा शोध सुरू ठेवला आहे. पक्षाच्या प्रारूप यादीत शिवसेनेचे कळव्यातील नगरसेवक उमेश पाटील, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोझा तसेच गणेश साळवी आदींचा समावेश करण्यात आल्याने पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी शिवसेनेचे नेते गुरुवारी कमालीचे सक्रिय झाल्याचे वृत्त आहे. इतर पक्षातून फुटून आलेले नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना या यादीत हक्काचे स्थान देण्यात आले असून नौपाडय़ातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला िखडार पाडण्यासाठी विद्यमान स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांच्यासोबत मृणाल पेंडसे आणि सुनेश जोशी या दोन ब्राह्मण उमेदवारांना पक्षाने संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

संघटनात्मक पातळीवर शिवसेनेपेक्षा फारच कमकुवत असलेल्या भाजपने गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेतील फुटिरांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील १३१ जागांवर उमेदवार उभे करण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे असल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांची जुळवाजुळव करण्यासाठी कंबर कसली होती. शिवसेनेतील काही दिग्गज नगरसेवक तसेच तुल्यबळ उमेदवारांसोबत संपर्क साधणे तसेच त्यांच्यापुढे वेगवेगळे प्रस्ताव ठेवण्यासाठी पक्षाचा एक मोठा गट गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाल्याचे चित्र आहे. या गटाकडून आलेल्या अहवालानुसार भाजपने गुरुवारी सकाळी संभाव्य उमेदवारांची एक प्रारूप यादी तयार करत त्यावर अंतिम चर्चा सुरू केली. या यादीत गळ टाकलेले शिवसेनेच्या काही नगरसेवकांचा समावेश करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपने तयार केलेल्या या प्रारूप यादीत शिवसेनेचे माजी महापौर हरिश्ंचद्र पाटील, कळव्यातील विद्यमान नगरसेवक उमेश पाटील आणि घोडबंदर भागातील माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांचा समावेश असल्याने शिवसेनेत तारांबळ उडाल्याचे चित्र होते. कळव्यातील माजी नगरसेवक गणेश साळवी यांच्यासाठी पक्षाने जागा सोडली असून कृष्णा पाटील, नंदा पाटील, नारायण पवार, शारदा पाटील, भरत चव्हाण तसेच शिवसेना सोडून नुकतेच भाजपमध्ये आलेले कोपरीतील नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांचा मुलगा किरण यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. नौपाडय़ातील बहुचर्चित प्रभागात भाजपने मृणाल पेंडसे आणि सुनेश जोशी या दोन ब्राह्मण उमेदवारांना िरगणात उतरवून शिवसेनेपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रभागात मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करणारे डॉ.राजेश मढवी यांच्या पत्नीसाठी एक जागा सोडण्यात आली आहे. या यादीला अंतिम स्वरूप देत असताना प्रभाग क्रमांक चार (हॅपी व्हॅली, हिरानंदानी मेडोज, आशर रेसिडन्सी आणि नळपाडा), पाच ( पवार नगर, वसंत विहार, शिवाईनगर, येऊर), सात (वर्तकनगर, ग्लॉस्को कंपनी, समतानगर), ३३ (चर्नीपाडा, रशीद कंपाउंड) या प्रभागांमधील उमेदवारांची नावे राखून ठेवण्यात आली आहेत. नळपाडा तसेच वर्तकनगर प्रभागातून शिवसेनेच्या एका बडय़ा नेत्याच्या प्रवेशासाठी ही यादी राखून ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजप प्रवेशाविषयी बोलण्यास नकार दिला. माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.