करोना काळात झुंडीने घेराव घालणाऱ्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे शुक्रवारी केली आहे. त्याचबरोबर महापौरांच्या आदेशामुळे सुरक्षारक्षकांनी गर्दी हटविण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत याप्रकरणी सुरक्षारक्षकांवर कारवाईची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तर, चुकीच्या आरोपांचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांनी कोणतीही गर्दी केली नव्हती, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

पोलीस आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार देण्यासाठी गेलेल्या भाजपच्या नेत्यांनी गर्दी केल्याप्रकरणी त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. यामुळे ठाण्यात शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष आता पोलिसांपर्यंत पोहचल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरामध्ये २३ कोटी रुपये खर्चून तीन पादचारी पूल उभारण्यात येत असून त्यास भाजपचे गटनेते मनोहर डुम्बरे यांनी आक्षेप घेतला होता. आगामी निवडणुकांसाठी निधी गोळा करण्याकरिता सत्ताधारी शिवसेनेने नव्या पुलांचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांसह  कार्यकत्र्यांनी शुक्रवारी पालिकेच्या गटनेता कार्यालयात शिरून डुम्बरे यांना घेराव घालून माफी मागण्यास सांगितले.

या प्रकरणी भाजपचे आमदार, जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची शुक्रवारी रात्री भेट घेऊन करोना काळात झुंडीने घेराव घालणाऱ्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच कारवाई झाली नाहीतर निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक आणि नगरसेविकांनी मला धमक्या देऊन आठ दिवसांत माफी मागण्यास सांगितले. मात्र, पादचारी पुलासंदर्भात केलेल्या आरोपांवर मी आजही ठाम आहे. आपण माफी कदापी मागणार नाही. भाजपाचे सर्व नगरसेवक आणि पक्ष आपल्या पाठीशी आहे.

– मनोहर डुम्बरे, भाजप गटनेते, ठाणे</p>

भाजपच्या गटनेत्यांनी चुकीचे आरोप केल्याने त्यांचा जाब शिवसैनिकांनी विचारला असून त्याठिकाणी कोणतीही गर्दी केली नव्हती. तसेच पोलीस आणि पालिका आयुक्तांची भेट घेताना भाजपच्या शिष्टमंडळाने गर्दी केली होती. त्यामुळे करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

– नरेश म्हस्के, महापौर, ठाणे