चर्चेच्या पहिल्याच बैठकीत भाजप-सेनेत जुंपली
डोंबिवलीलगत असलेली २७ गावे वगळून शिवसेनेची कोंडी करू पाहणाऱ्या भाजपने रविवारी रात्री एक पाऊल मागे घेत कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीची प्राथमिक बोलणी सुरू केली. मात्र, बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेना नेत्यांकडून होणाऱ्या दगाफटक्याचा मुद्दा मांडत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना हाताशी धरत पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत युती व्हावी यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, युती अमान्य असलेल्या कल्याणातील भाजप नेत्यांनी या चर्चेची सुरुवात नकारात्मक केली.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रमुखपद भाजपने भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडे सोपविले आहे. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार या दोघांनाही वगळून पाटील यांच्याकडे निवडणुकीचे प्रमुखपद देण्यात आल्याने या खेळीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. भाजपशी युती झाल्यास शिवसेनेला ही निवडणूक सोपी जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी खासदार पाटील यांच्याकडे आग्रह धरत रविवारी युतीसंबंधीच्या प्राथमिक बोलणीला सुरुवात केली. शिवसेनेला युती हवी आहे, अशा स्वरूपाची भूमिका िशदे पूर्वीपासून मांडत आहेत. मात्र, नरेंद्र पवार यांच्यासह डोंबिवलीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युती करू नये, अशी भूमिका मांडली आहे.
या पाश्र्वभूमीवर रविवारी झालेल्या दोन्ही पक्षनेत्यांच्या बैठकीत भाजपने आक्रमक भूमिका घेत शिवसेना नेत्यांना खडे बोल सुनावले. युती झाल्यानंतर भाजपला सोडण्यात आलेल्या जागांवर शिवसेना अपक्ष उमेदवार उभे करते. भाजप उमेदवारांना पाडण्यासाठी दगा केला जातो, अपक्षांना रसद पुरवली जाते. युती करून दगा करायचा असेल तर बोलणीची प्रक्रियाही नको, असा सूर भाजप नेत्यांनी या बैठकीत लावला. दरम्यान, युतीसंबंधीची पहिली बैठक सकारात्मक झाली असून काही मुद्दे दोन्ही पक्षांना विचार करावयास लावणारे आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. खासदार कपिल पाटील यांनीही अशा स्वरूपाची चर्चा झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.