राज्यात संघर्षांची परिस्थिती असताना ठाण्यात मात्र एकत्र
मुंबईसह राज्यभरात शिवसेना-भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला असताना ठाणे जिल्ह्य़ात मात्र या दोन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांमध्ये नव्या मैत्रीपर्वाला सुरुवात झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे असा थेट सामना रंगल्याने या दोन्ही पक्षांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. मात्र, नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांना धोबीपछाड देताना शिवसेनेने भाजपच्या साथीने स्थायी समितीत विजय मिळवून इतिहास रचला. त्यापाठोपाठ अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेत विरोधात असणाऱ्या भाजपला सत्तेत घेण्यात आले, तर कल्याण-डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आणि नरेंद्र पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे स्पष्ट आदेश शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. विधान परिषद निवडणुकीत रवींद्र फाटक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलेली भूमिका निर्णायक ठरल्याने सध्या तरी शिवसेना नेत्यांना भाजपप्रेमाचे भरते आल्याचे चित्र आहे.
पुरेसे संख्याबळ नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते वसंत डावखरे यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने सुरुवातीपासूनच शिवसेना नेते सावध झाले होते. युतीचा उमेदवार जाहीर होताच घेण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीत भाजपच्या एका आमदाराने जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे शिवसेना चिंतातुर होती. या निवडणुकीत भाजपकडे १८९ मतांची निर्णायक रसद होती. त्यातही भाजपचे सध्याचे जिल्हा नेतृत्व पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी नेत्यांकडे आहे. नव भाजपप्रेमी नेत्यांची रसद आपल्याकडे वळविण्याचे डावखरे गटाचे जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री क्लब येथे एक तातडीची बैठक आयोजित केली आणि त्यास मुख्यमंत्र्यांना पाचारण केले. भाजपशी समन्वयाचे गणित बांधत आणि मदतीसाठी थेट मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावल्याने फाटक यांचा विजय झाला. ‘काही चुकीचे घडल्यास राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते’ या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना सूचक इशारा दिल्याने भाजपच्या प्रमुख नेत्यांनी निवडणुकीत फाटाफूट होणार नाही याची दक्षता घेतली.

शिवसेनेकडून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत पालकमंत्री शिंदे भाजपसोबत युतीसाठी कमालीचे आग्रही होते. शिंदे यांचा आग्रह धाब्यावर बसवत स्वत: मुख्यमंत्री कल्याणच्या आखाडय़ात उतरले आणि शिवसेनेच्या अस्तित्वालाच त्यांनी आव्हान उभे केले. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील कार्यक्रमावर बहिष्कार टाकून शिंदे यांनी सत्तेच्या सर्वोच्च पदाला जुमानत नसल्याचे वातावरण निर्माण केले. मात्र, अलीकडच्या काळात त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जमवून घेत भाजपच्या स्थानिक नेत्यांशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत स्थायी समिती सभापतीपद पटकाविताना भाजपचे एक मत निर्णायक ठरले. त्यासाठी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांना सोबत घेऊन आवश्यक ती खेळी केली. बदलापुरात एकहाती सत्ता असूनही तेथील उपनगराध्यक्षपद भाजपला देण्यात आले.ठाणे महापालिकेत स्थायी समिती सभेत भाजपचा एकमेव सदस्य असूनही थेट सभापतीपद भाजपला देण्यात आले आहे. अंबरनाथमध्येही भाजपला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले असून कल्याण-डोंबिवलीत हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत आहेत.

भाजपला योग्य मान
शिवसेनेकडून सातत्याने दुय्यम वागणूक मिळत असल्याने भाजप नेते अस्वस्थ होते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये अजूनही शिवसेनेविषयी फारसे विश्वासाचे वातावरण नाही. मात्र, अलीकडच्या काळात एकनाथ शिंदे यांनी भाजपला योग्य मान मिळेल अशाी वातावरणनिर्मिती केली असून ठाणे महापालिका निवडणुकीपर्यंत तरी ही मैत्री टिकेल, अशी आशा आहे.