महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली तसा मतदार यादीतील गोंधळ वाढू लागल्याने नगरसेवक, उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. काही राजकीय मंडळींनी मतदार याद्या तयार करणाऱ्या यंत्रणेला हाताशी धरून मतदार याद्या तयार करून घेतल्या आहेत, असा आरोप राजकीय मंडळींकडून केला जात आहे. मतदार यादी तयार करताना घोटाळा झाला आहे, अशा तक्रारी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.

मतदारयाद्यांच्या सीडी उघडल्या तर त्या रिकाम्या असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नगरसेवक, उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मतदार यादीत गोंधळ घालणाऱ्या अधिकारी, यंत्रणेची चौकशी करून दोषींवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम ३९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याकडे केली आहे. अशीच तक्रार माजी नगरसेवक राजन सामंत यांनी केली आहे.

आयरे प्रभागातील मतदारांची सीडी १०० रुपये देऊन पालिकेतून विकत घेतली. त्या सीडीत मतदारांची नावे नसल्याचे निदर्शनास आले, असे सामंत यांनी सांगितले. अनेक नगरसेवक, उमेदवारांनी स्वत:ची यंत्रणा राबवून घरोघर जाऊन प्रभागातील मतदारांची नावे निश्चित केली आहेत. या मधील ५० टक्क्यांहून अधिक नावे मतदार यादीत नाहीत. पालिकेच्या मतदार याद्यांमधून प्रभागातील मतदारांची नावे बेपत्ता किंवा अन्य प्रभागात टाकण्यात आली आहेत, असे म्हात्रे यांनी आयोगाच्या निदर्शनास आणले आहे.

अनेक इच्छुक उमेदवारांची नावे मतदार यादीत नाहीत. प्रभागातील उमेदवाराचे नाव नसेल तर त्याने निवडणूक कशी लढवायची असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. प्रभागातील मतदार यादीत नाव नसणे, ते अन्य प्रभागात असणे या विषयी नागरिकांनी पालिकेत हरकती सूचना दाखल केल्या होत्या. या नागरिकांची ओळखपत्र तपासून अशा मतदारांच्या अधिकाऱ्यांनी समतल याद्या तयार केल्या होत्या. या समतल याद्या पालिका अधिकाऱ्यांनी याद्या तयार करणाऱ्या यंत्रणेकडे देऊन नंतर सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. परंतु, समतल याद्या एजन्सीकडे दिल्यानंतर त्यात फार फेरफार न करताच दुसऱ्याच दिवशी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या अधिकारी, एजन्सी यांनी काही राजकीय दबावतंत्रामुळे हा गोंधळ घातला आहे, अशी टीका करणारे पत्र नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आयोगाला पाठविले आहे.