News Flash

बदलापूरमध्ये शिवसेनेचे ‘एकला चलो’

बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने युती न करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी प्रसिद्ध

| March 18, 2015 12:22 pm

बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने युती न करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावरच ‘कुळगाव – बदलापूरचे आता मिशन ३५’ असे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात व केंद्रात भाजपची सेनेशी युती असली तरी बदलापूर पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने भाजपला खिजगणतीतही न पकडल्याचे दिसून येत आहे.
 त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत सेना व भाजप यांची युती होणार नाही, हे आता पुन्हा अधोरेखित झाले आहे. या निर्णयाला सेनेच्या जिल्हा नेतृत्वाचाही पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. कारण, या मिशन ३५ च्या पुस्तिकेतील प्रस्तावनेत सार्वत्रिक पालिका निवडणूक २०१५ च्या कार्यक्रमास सुरुवात झाली असून मिशन ३५ हे ध्येय समोर ठेवून पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील हे मार्गक्रमण करत आहे, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपबरोबरच्या युतीची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे बदलापुरात भाजप विरोधी शिवसेना हा सामना रंगणार असून सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींचे उट्टे या निवडणुकीतील प्रचार सभांमध्ये सेना-भाजपचे नेते भरून काढण्याची शक्यता आहे.  
भाजप लाटेच्या आशेवर?
बदलापूर व अंबरनाथमधील शहर भाजपचे कार्यकर्ते अजूनही लाटेच्या भरवशावर असल्याचे दिसून येत आहे. तिकिटासाठी या पक्षाच्या वरिष्ठांकडे कार्यकर्त्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे कोणताही कार्यक्रम अथवा जाहीरनामा या पक्षाकडून अद्याप प्रसिद्ध झालेला नाही.
अपवाद फक्त स्थानिक आमदार किसन कथोरे यांचा. स्थानिक कार्यकर्त्यांसोबत सध्या ते बदलापूरमधील गृहनिर्माण सोसायटय़ा पिंजून काढत आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त भाजपचे अन्य वरिष्ठ नेते अद्याप शहरांत फिरकलेले नाहीत. त्यामुळे अजूनही मोदीलाटेमुळे निवडणूक सोपी जाईल, या आशेत या पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अंबरनाथमध्येही युती नको
अंबरनाथमध्येही सेना-भाजपमधून विस्तव जात नाही. तिथेही सेनेच्या स्थानिक नेतृत्वाने युती न करण्याचा हट्ट धरला आहे. त्यामुळे अंबरनाथमध्येही युती होणार नसून भाजप आमदार नरेंद्र पवार यांनीदेखील युती न करण्याची मागणी वरिष्ठांच्या कानावर घातल्याचे समजते. त्यामुळे भाजपसुद्धा स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:22 pm

Web Title: shiv sena contest badlapur civic body poll alone
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 सिमेंट रस्ते कामांसाठी आता नवा सल्लागार
2 संशोधकांसाठी पर्वणी
3 कल्याण-डोंबिवली शहरबात : भांडवली करप्रणालीची गळचेपी
Just Now!
X