परिसरातील पाहणी दौऱ्यांवरून शिवसेना नगरसेवक, भाजप आमदारामध्ये हमरीतुमरी

ठाणे : विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे. ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेल्या विविध भागांतील पाहणी दौऱ्यांवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी ‘स्टंटबाजी’ अशी टीका केली. तर, ‘आम्ही गाजर वाटप करत नाही. वर्षभर नागरिकांसाठी काम करतो,’ अशा शब्दांत केळकर यांनी भोईर यांना प्रत्युत्तर दिले.

शिवसेना आणि भाजप यांनी गेली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा पराभव करत ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर हे विजयी झाले होते. ठाणे शहर मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेच्या ताब्यात होता. त्यामुळे निवडणुकीत झालेला पराभव शिवसेना नेत्यांच्या जिवारी लागला होता. या निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेवर आले असले तरी ठाण्यात मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू असल्याचे चित्र आहे. यातूनच शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी आमदार केळकर यांच्यावर टीका केली आहे. गेली पाच वर्षे ठाणे विधानसभा मतदारसंघात कोणतीही ठोस विकासकामे न करणारे भाजपचे आमदार संजय केळकर आता ठिकठिकाणी पाहणी दौरे करून स्टंटबाजी करत मतदारांना आश्वासनांचे गाजर वाटप करीत आहेत. बाळकुम येथील यशस्वीनगर येथे त्यांनी असाच पाहणी दौरा आयोजित करून रहिवाशांची दिशाभूल केल्याची टीका भोईर यांनी केली आहे.

‘विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. गेली पाच वर्षे अज्ञातवासात असलेले आमदार केळकर यांना मतदारांच्या समस्यांची आता आठवण झाली आहे. त्यांच्या आमदारपदाच्या कारकीर्दीत चार पावसाळे झाले. तेव्हा मात्र त्यांना मतदारांची आठवण झाली नाही. गेल्या पाच वर्षांत त्यांनी नाल्याबाबत पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे मतदारच येत्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवतील,’ अशी टीका भोईर यांनी केली.

या टीकेला संजय केळकर यांनीही प्रत्युत्तर दिले. ‘शेकडो स्थानिक रहिवासी तेथील समस्या सोडविण्यासाठी माझ्याकडे आले होते. त्यानुसार ठाणे आणि मुंबई महापालिका अधिकाऱ्यांसोबत दौरा करून तेथील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. आम्ही गाजर वाटप करत नाही तर वर्षभर नागरिकांसाठी काम करतो. तसेच या प्रभागात यापूर्वी दहा वेळा नागरिकांच्या भेटीसाठी गेलो आहे. तसेच मित्रपक्षांतील कुणी काय बोलावे हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.