महापौरांच्या दालनाची शिवसेना नगरसेवकांकडून तोडफोड

भाईंदर : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाचा विषय सत्ताधारी भाजपने स्थायी समितीच्या सभेत घेण्यास नकार दिल्याने चिडलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर आणि स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली. यावेळी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनाही शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत युतीबाबतची चर्चा सुरू असताना मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेने भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुकीत आमदार नरेंद्र मेहता यांचा प्रचार न करण्याचे यावेळी सेना नगरसेवकांनी जाहीर करून टाकले.

भाईंदर पूर्व भागातील आझाद नगर येथे सामाजिक वनीकरण आणि खेळाचे मैदान यासाठी राखीव असलेल्या भूखंडावर बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यात येणार आहे. या कलादालनाला शासनाने मंजुरीदेखील दिली आहे. कलादालन उभारण्यासाठी महापालिकेच्या निधीसह आमदार आणि खासदार निधी वापरण्यात येणार असून शासनाकडूनही निधी मिळणार आहे. कलादालनाच्या बांधकामासाठी काढलेल्या निविदेला मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मंगळवारी होत असलेल्या स्थायी समिती सभेपुढे दिला होता. परंतु हा विषय घेण्यास स्थायी समिती सभापतींनी नकार दिला. त्यामुळे शिवसेना सदस्यांनी जोरदार तोडफोड केली. यावेळी महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.

मंगळवारी सकाळी शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसैनिक पूर्ण तयारीनिशी सभेला आले होते. शिवसेनेच्या स्थायी समितीच्या सदस्यांव्यतिरिक्त इतर सर्व नगरसेवकदेखील सभागृहात उपस्थित झाले. बैठक सुरू होताच बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा विषय घ्या अन्यथा सभा सुरू होऊ  दिली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका सेना नगरसेवकांनी घेतली. मात्र या कामासाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत प्रशासनाकडून तपशील मिळाला नसल्याने विषय घेणार नसल्याचे स्थायी समिती सभापती रवी व्यास यांनी सांगताच सेना नगरसेवकांच्या संतापात भर पडली आणि त्यांनी सभागृहातील माईक तोडायला तसेच खुर्च्याची फेकाफेक करायला सुरुवात झाली. यावेळी भाजप आणि शिवसेना नगरसेवकात धक्काबुक्की देखील झाली.

त्यानंतर सेना नगरसेवकांनी आपला मोर्चा महापौर डिंपल मेहता यांच्या दालनाकडे वळवला. यावेळी सभागृहाबाहेर बाहेर जमा झालेले शिवसैनिकही यात सहभागी झाले. महापौर बसत असलेल्या मुख्य दालनाच्या काचेवर ख्रु्ची फेकून ती फोडण्यात आली तसेच कार्यालयातील संगणक, दूरध्वनी संच, खुर्च्या यांची मोठय़ा प्रमाणात तोडफोड करण्यात आली. यावेळी महापौर दालनातील कर्मचारी भयभीत झाले होते. त्यानंतर नगरसेवकांनी आयुक्त दालनाकडे देखील धाव घेतली. आयुक्तांच्या दालनाबाहेर असलेल्या खुर्च्या फेकून शिवसेनेने आपला राग व्यक्त केला. यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार करत भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात प्रचंड शिवीगाळ केली.

पोलीस उपविभागीय अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा महापालिकेत दाखल झाल्यानंतर वातावरण निवळले. मात्र शिवसेनेच्या या राडय़ामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

नरेंद्र मेहतांवर शिवसेनेचा राग

या सर्व घडामोडीत शिवसेनेकडून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनाच लक्ष्य करण्यात आले होते. त्यांच्या इशाऱ्यावरच हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी मेहता यांच्या विरोधात खुले आम अपशब्द वापरत आगामी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मेहता यांच्यासाठी काम न करण्याची आक्रमकता जाहीर केली.

गेल्या तीन वर्षांपासून कलादालनाचा विषय भाजपकडून जाणूनबुजून टाळण्यात येत आहे. निधीची तरतूद करण्यात आलेली असतानाही स्थायी समितीमध्ये दोन वेळा विषय फेटाळून लावण्यात आला. यावरून भाजपला बाळासाहेब ठाकरे यांचे कलादालन होऊ द्ययचे नाही हे स्पष्ट झाले आहे. शिवसैनिकांचे दैवत असलेल्या बाळासाहेबांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका निलम ढवण यांनी व्यक्त केली.

प्रस्तावामध्ये बाळासाहेब ठाकरे कलादालन सोबत प्रमोद महाजन कला दालनाचा देखील विषय होता. यासाठी आवश्यक असलेला निधी कसा उभारला जाणार आहे याचा खुलासा प्रशासनाकडे मागण्यात आला होता,  मात्र त्याचा समाधानकारक खुलासा न आल्याने विषय स्थगित ठेवण्यात आला. कलादालनाचे काम निधी अभावी रखडू नये यासाठी सर्व निधी जमल्यानंतर काम सुरू करण्याची भूमिका भाजपची आहे असा खुलासा करून स्थायी समितीचे सभापती रवी व्यास यांनी शिवसेनेने केलेल्या तोडफोडी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनासाठी निधीची तरतूद असल्याने सत्ताधारी भाजपने हा विषय घ्यायला हवा होता. बाळासाहेब ठाकरे हे सर्वासाठीच आदरणीय आहेत. त्यामुळे कलादालनासाठी निधी कमी पडत असल्यास काँग्रेसचे नगरसेवक निधी देतील. मात्र यासाठी कायदा हाती घेणे चुकीचे आहे.

– जुबेर इनामदार, गटनेते, काँग्रेस</strong>

प्रस्तावासंदर्भात भाजप आणि शिवसेनेसोबत चर्चा झाली होती मात्र निधीवरून दोन्ही पक्षात एकमत झाले नाही. घडलेल्या वस्तुस्थिती बाबत पोलीसांना अवगत करण्यात येईल आणि यासाठी महापालिका सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे

– बालाजी खतगांवकर, आयुक्त.

महापालिकेकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकाराची संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल

– चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भाईंदर