पैशाच्या मागणीवरून काम बंद पाडण्याची धमकी

एका रेडीमिक्स काँक्रीटचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे खंडणीची मागणी केल्याच्या आरोपावरून ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या विरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खंडणीची रक्कम दिली नाही तर काम बंद पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप ठेकेदाराने केला आहे.

मुंबईतील मालाड परिसरात राहणारे रशमीतसिंह कोहली (३५) यांचा रेडीमिक्स काँक्रीट पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. ठाण्यातील कोलशेत आणि बाळकुम भागात उभ्या राहत असलेल्या दोन गृहप्रकल्पांना रेडीमिक्स काँक्रीटचा पुरवठा करण्याचे काम त्यांनी घेतले आहे. २४ मार्चला बाळकुमचे स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी कार्यालयात बोलावून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. ‘माझ्या विभागात काम करण्याच्या मोबदल्यात इतर काँक्रीट पुरवठा कंपन्या मला प्रत्येक क्यूबिक मीटरमागे २५० रुपये देतात. त्याप्रमाणे तुम्ही द्या. तसेच वाहतुकीचे काम मी सांगेल त्या लोकांनाच द्या’, अशी धमकी दिली. मात्र, त्यास नकार दिल्याने भोईर यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि पैसे दिले नाही तर काम बंद पाडण्याची धमकी दिली. या प्रकरणी रशमीतसिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजय भोईर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.