नऊ प्रभाग समित्यांसाठी निवडणूक; एक जागा भाजपकडे

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने बाजी मारली असून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या उथळसर प्रभाग समितीत मात्र भाजपच्या नंदा कृष्णा पाटील यांनी विजय मिळवला आहे. या प्रभाग समितीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या साथीने भाजपला धक्का देण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून होण्याची शक्यता व्यक्त होत होती.

ठाणे महानगरपालिकेच्या नऊ  प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी शनिवारी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या आधिपत्याखाली निवडणूक सभा आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये सन २०१८ -१९ या वर्षांकरिता सर्व प्रभाग समिती सभापती निवड बिनविरोध करण्यात आली.

ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याने उथळसर आणि मुंब्रा प्रभाग समितीचा अपवादवगळता सर्व प्रभाग समित्यांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असेल हे स्पष्ट होते.

त्यानुसार माजिवडा-मानपाडा  प्रभाग समितीच्या सभापतीपदी सिद्धार्थ दिलीप ओवळेकर, आमदार प्रताप सरनाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या सभापतीपदी रागिणी भास्कर बैराशेट्टी, लोकमान्यनगर- सावरकर प्रभाग समिती कांचन विजय चिंदरकर, वागळे प्रभाग समिती  संध्या सुनील मोरे, कळवा प्रभाग समितीच्या सभापतीपदी प्रकाश बर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कळव्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे वर्चस्व असले तरी प्रभाग समितीच्या रचनेमुळे या ठिकाणी शिवसेनेला विजय मिळवता आला आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या उथळसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नंदा कृष्णा पाटील यांची निवड झाली आहे. मुंब्रा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी अनिता राजन किणे, नौपाडा कोपरी प्रभाग समिती  शर्मिला गायकवाड पिपंळोलकर यांची निवड झाली आहे.

नौपाडय़ात भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असली तरी प्रभाग समितीच्या रचनेत कोपरी विभागाचा या समितीत समावेश करण्यात आल्याने येथे शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दिवा प्रभाग समितीत शिवसेनेचे शैलेश मनोहर पाटील यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली.