स्थायी समिती सभापती निवडणूक; लिफाफ्यातील नावाकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेना तोंडघशी

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : राज्यातील सत्तेत एकनाथ शिंदे यांना नगरविकास विभागासारखे महत्त्वाचे खाते मिळाल्याने ठाणे, डोंबिवलीत शिंदेशाहीला बळकटी मिळाल्याची चर्चा असतानाच शिवसेनेतील स्थानिक असंतोषाचा फायदा घेत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिंदेशाहीला धक्का दिल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांना डावलून तुलनेने नवख्या उमेदवाराला दिलेल्या उमेदवारीचा फटका शिवसेनेला या निवडणुकीत बसला आहे. डोंबिवलीसारख्या बालेकिल्ल्यातच विरोधकांनी एकत्र येऊन दिलेला धक्का शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून वामन म्हात्रे यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकाची नाराजी आणि काँग्रेस-मनसेला पंखाखाली घेत भाजपच्या रणनीतीने शिवसेनेला धोबीपछाड दिल्याने पक्षाच्या गोटात अस्वस्थता आहे.

पाच वर्षांच्या काळात एकदा स्थायी समिती पद देण्यात येईल, असे आश्वासन ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांना जिल्हा नेत्यांनी दिले होते. हा शब्द पूर्ण करावा यासाठी शिवसेनेतील जिल्हा नेत्यांनी वामन म्हात्रे यांना सभापतिपदी बसविण्यात यावे, असे बंद पाकीट शिवसेनेच्या पालिकेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे पाठविले होते. असे असताना या प्रस्तावाकडे डोळेझाक केल्यानेच स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना तोंडघशी पडल्याची चर्चा आता रंगली आहे.

म्हात्रे यांची नाराजी भोवली

म्हात्रे यांना डावलून सेनेने कल्याणमधील नगरसेवक गणेश कोट यांचे नाव पुढे केले आणि या अंतर्गत चढाओढीत शिवसेना तोंडघशी पडली असल्याची माहिती शिवसेनेतील एका वरिष्ठ विश्वसनीय सूत्राने दिली.

जिल्हा नेत्यांनी वामन म्हात्रेंचे नाव स्थायी समिती सभापती पदासाठी सुचविल्याने पालिकेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वामन म्हात्रेंना उमेदवारी देण्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज भरून घेतला. भाजपचे स्थायी समितीत पुरेसे संख्याबळ नसल्याने ते निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत नसल्याची गणिते करून आणि त्यांचा बिनशर्त पाठिंबा मिळेल असा विचार करून सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नेत्यांनी सुचविलेल्या वामन म्हात्रे यांना डावलून कल्याणमधील नगरसेवक गणेश कोट यांचे नाव पुढे केले.

काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने महाविकास आघाडीचा धर्म पाळून काँग्रेस सदस्य शिवसेना उमेदवाराला मतदान करील असे सेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते.

पण काँग्रेस सदस्याने त्या पदाधिकाऱ्याचा आदेश झिडकारला. मनसे सदस्याने तटस्थ राहण्याची भूमिका घ्यावी असे ठरले होते.

तटस्थ राहून मत फुकट घालविण्यापेक्षा मतदान करून विकास कामे पदरात पाडून घ्या, असा सल्ला एका नेत्याकडून देण्यात आला. मनसेचा पालिकेतील महाविकास आघाडीच्या बाजूने खलबत करीत असलेला एक पदाधिकारी या प्रक्रियेत अनभिज्ञ राहिला. अशा फुटीर दोन्ही मतांची बेगमी शिवसेनेला गाफील ठेवून बांधण्यात भाजप यशस्वी झाले आणि सेना उमेदवाराचा पराभव झाला.

आपला पत्ता कापला हे समजताच शपथ घेत आपण मतदानासाठी येणार नाही असे सांगून वामन म्हात्रे पालिकेतून निघाले. त्यानंतर ते गंभीर आजारी पडले. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हात्रे यांचा शोध घेतला. पण ते कोणत्याही रुग्णालयात सापडले नाहीत. या संधीचा लाभ भाजपने उठविला. सुरुवातीला गाफील राहिलेल्या सेनेला अचानक धोबीपछाड देत भाजपने बाजी मारली. मतदानाला गैरहजर राहिल्याने सेना सदस्य वामन म्हात्रेंवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाप्रमुख लांडगे यांनी सांगितले आहे.

पक्षादेश डावलून भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे काँग्रेस गटनेते व नगरसेवक नंदू म्हात्रे, नगरसेविका हर्षदा भोईर यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील परिवहन समिती निवडणुकीच्यावेळीही अशाचप्रकारे डोंबिवलीतील सदस्यांनी अन्य पक्षाला साथ दिली होती. त्यामुळे हे बंडखोरीचे लोण बंद करण्यासाठी यावेळी म्हात्रे, भोईर यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल.

-सचिन पोटे, जिल्हाध्यक्ष, कल्याण जिल्हा काँग्रेस