19 March 2019

News Flash

शेतकरी एल्गाराला शिवसेनेची साथ

शिवसैनिकांनी मोर्चेकऱ्यांच्या मदतीसाठी झोकून दिल्याचे चित्र शनिवारी दिवसभर पहायला मिळाले.

संग्रहित छायाचित्र

मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकला; वाहतूक बदलामुळे शहरात कोंडी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार करत नाशिकहून पाच दिवसांची पायपीट करत मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल बावटय़ातील हजारो शेतकऱ्यांच्या ताफ्याचे शनिवारी ठाण्याच्या वेशीवर शिवसेनेकडून जोरदार स्वागत करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेकडो शिवसैनिकांचे पथक ठाणे, शहापूर, भिवंडी भागांत शनिवारी दिवसभर तैनात करण्यात आले होते. सुमारे ५० हजारांहून पाण्याच्या बाटल्या, आंघोळीसाठी १५ पाण्याचे टँकर, मोबाइल, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, झोपण्यासाठी ताडपत्र्या, ब्लँकेट्स, चादरींची व्यवस्था शिवसैनिकांकडून या शेतकऱ्यांसाठी करण्यात आली. लाल बावटा खांद्यावर घेत निघालेल्या या सरकारविरोधी मोर्चाला भगवेधारी शिवसैनिकांनी दिलेली साथ पाहून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे आयोजित करण्यात आलेला मोर्चा शनिवारी सायंकाळी ठाणे-मुंबईच्या वेशीवरील आनंदनगर चेकनाक्यावर पोहोचला. त्याआधी शुक्रवारी रात्री उशिरा हजारो मोर्चेकरी शहापूर परिसरात पोहोचताच स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी धावले. या मोर्चाचा आकार आणि त्यास मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपवगळता विविध राजकीय पक्षांनी यापूर्वीच त्यास पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यभर सरकारविरोधी आंदोलन पुकारणारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते या मोर्चापासून काहीसे लांब असल्याचे चित्र असले तरी किसान सभेतील नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. असे असताना शहापूर येथे मोर्चेकरी येताच शुक्रवारी रात्री उशिरा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेत शिवसेनेची तुम्हाला साथ असल्याचे जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची संवाद साधत शिंदे यांनी काही तास या ठिकाणी तळ ठोकला होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्य़ातील प्रत्येक महत्त्वाच्या शहरात स्थानिक शिवसैनिकांनी मोर्चेकऱ्यांच्या मदतीसाठी झोकून दिल्याचे चित्र शनिवारी दिवसभर पहायला मिळाले.

विरोधकांचा पाठिंबा

* कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव सारख्या मागण्यांसाठी नाशिकहून सुरू झालेला डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखालील किसान सभेचा लाँग मार्चला शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

* मनसेचे कार्यकर्ते या मोर्चात मुंबईच्या वेशीवर सहभागी होतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसनेही या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला असून भाजपची सर्वपक्षीय कोंडी होणार आहे.  राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मोर्चाला पाठिंबा असल्याचे सुनील तटकरे यांनी जाहीर केले होते.

मदतीसाठी पालिकेची यंत्रणा

शनिवारी सायंकाळीच काही मोर्चेकरी आनंदनगर चेकनाका येथे पोहोचल्याचे कळताच शिवसैनिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना साथ देण्याचा आदेश असल्याचे सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले. किसान परिषदेनेही शिवसेनेच्या भू्मिकेचे स्वागत केले असून सत्तेवर असतानाही शिवसेनेने आम्हाला साथ दिली ही विशेष बाब आहे, असे किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.

खारेगावऐवजी आनंदनगर..

मुंबई-नाशिक महामार्गावरून येणाऱ्या मोच्र्यातील शेतकरी खारेगाव टोलनाक्याजवळ थांबणार होते आणि रविवारी मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले होते. मात्र ऐन वेळेस आयोजकांनी खारेगावऐवजी आनंदनगर चेक नाक्यापर्यंत मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाहतूक पोलिसांचीही तारंबळ उडाली. दरम्यान, खारेगाव येथे प्रचंड मच्छर असल्यामुळे ते ठिकाण बदलल्याचे सांगण्यात आले.

* मोर्चामुळे ठाणे, कल्याण, भिवंडीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. त्यात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहने भिवंडी, कल्याण तसेच घोडबंदरमार्गे वळविण्यात आली आहेत. हे बदल १० ते १२ मार्च या कालावधीपर्यंत लागू राहणार आहेत. मात्र हा मोर्चा शनिवारी सायंकाळीच मुंबईच्या वेशीवर पोहोचला असल्याने हे वाहतूक बदल रद्द होण्याची शक्यता आहे. शनिवारी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांना बंदी घालून ती मोर्चेकऱ्यांसाठी खुली करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गिकेवर शेतकऱ्यांचे जथे दिसत होते. ठाणे-मुंबई मार्गिका बंद करण्यात आल्यामुळे ऐन संध्याकाळच्या वेळी वाहतूक संथ गतीने सुरू होती.

 

 

First Published on March 11, 2018 3:19 am

Web Title: shiv sena extends support to farmers march against bjp government