उल्हासनगर पालिकेत स्वबळावर लढण्याचा सेनेचा इशारा

उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये आतापासूनच खटके उडण्यास सुरुवात झाली असून पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांच्या भाजपमधील प्रवेशाचे निमित्त साधून शिवसेनेने युतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सिंधी समाजाची मते एकवटण्यासाठी ओमी यांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर कलानी कुटुंबीयांच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा मुद्दा पुढे आणत सेनेने आधीपासूनच भाजपची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

उल्हासनगर शहरात एका दशकाहून अधिक सत्ता गाजविणाऱ्या पप्पू कलानी यांचा सहा वर्षांपूर्वी भाजपच्या कुमार आयलानी यांनी पराभव केला. या पराभवापाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीतही पप्पू समर्थकांचा पराभव करत शिवसेना-भाजप युतीने सत्ता प्रस्थापित केली. लागोपाठ झालेल्या या पराभवांमुळे उल्हासनगरातून पप्पू राजवटीचा अस्त झाल्याची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची हवा असतानाही पप्पू यांची पत्नी ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला. उल्हासनगरातील सिंधीबहुल समाज कलानी यांच्यामागे एकवटल्याने भाजपला धक्का बसल्याची चर्चा असतानाच आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसोबत दोन हात करण्यासाठी पप्पूचे चिरंजीव ओमी याला भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. माजी आमदार व उल्हासनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी कोणत्याही परिस्थिती ओमी कलानींना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही, अशी आग्रहाची भूमिका घेतली आहे. तरीही काही भाजप पदाधिकारी पडद्यामागून ओमीला प्रवेश देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आयलानी यांनी पक्षाच्या कोअर कमिटीत सार्वमत घेऊन ओमी यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, असा ठराव मंजूर करून तो भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाठविला आहे.

या हालचालींचा एकीकडे जोर आला असताना शिवसेनेने मात्र ओमी यांच्या भाजप प्रवेशास जाहीर विरोध करत आयलानी यांना अप्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केला आहे. उल्हासनगरमधील मराठीबहुल वस्त्यांमध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर शिवसेनेला दुखवून स्वतंत्र निवडणूक लढवायची झाल्यास कलानी यांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नसल्याचे भाजपच्या एका मोठय़ा गटाचे म्हणणे आहे. असे असताना शिवसेनेनेच ओमी प्रवेशाला विरोध केल्याने भाजपची मोठी कोंडी झाली आहे. शिवसेनेनेही भाजपबरोबर दोन हात करण्यासाठी रिपाइं आठवले गटासोबत युतीची चर्चा सुरू केली आहे. मागील काही वर्षांपासून उल्हासनगर पालिकेत शिवसेना-भाजपची युतीची आहे.

वादावर पडदा

उल्हासनगरमधील भाजपच्या एका गटाने गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ओमी कलानीबाबतचा अंतिम निर्णय कुमार आयलानी घेतील, असे स्पष्ट करून या विषयावर कायमचा पडदा टाकल्याचे बोलले जात आहे.