राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप
ठाणे महापालिकेची निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांसाठी स्वत:चे धरण खरेदी करण्याचा मुद्दा आक्रमकरीत्या लावून धरण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईसारखे शहर पाणी पुरवठय़ाच्या आघाडीवर स्वयंपूर्ण असताना ठाणे महापालिकेस हे का शक्य होत नाही, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाई धरण विकत घेण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी मंगळवारी केली. विशेष म्हणजे, ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेचे टक्केवारीचे गणित फिस्कटल्यामुळेच शाईचे काम रखडले आणि ठाणेकरांना धरणापासून वंचित रहावे लागले, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या शाही धरणाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी २२८ कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरातील पाणी समस्या लक्षात घेता महापालिकेने तात्काळ राज्य शासनाकडे निधीचा भरणा करावा, अशी मागणी आव्हाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
शाई धरण कार्यान्वित करण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा बोलावण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे. ठाणे महापालिकेचे हक्काचे धरण नसल्यामुळे शहरातील पाणी नियोजनासाठी दुसऱ्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. काही महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रातील काही परिसरात पाण्याची तीव्र समस्या जाणवू लागली आहे. काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेसाठी शाई धरण उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता आणि राज्य सरकारनेही त्याला हिरवा कंदील दाखविला होता. मात्र, ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे टक्केवारीचे हिशोब चुकल्यामुळेच या धरणाचे काम रखडले, असा खळबळजनक आरोप मंगळवारी आव्हाड यांनी केला. या धरणाच्या कामाचा खर्च पेलवत नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्यामुळे धरणाचे काम एमएमआरडीएकडे देण्यात आले. या धरणासाठी राज्य शासनाकडे २२८ कोटी रुपयांचा निधी भरावा लागणार आहे. एमएमआरडीए हा निधी भरण्यास तयार नसेल तर धरणाचे काम प्रलंबित राहील, असे स्पष्टीकरण राज्याचे पाणी पुरवठामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे या धरणाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घ्यावा, असे आव्हाड यांनी सांगितले.
ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रयत्न केले जात असून यात रस्ते रुंदीकरण तसेच विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे; मात्र, शहरात पाणी नसेल तर त्या शहराला काहीच अर्थ उरत नाही. ठाणेकरांची पाणी ही मुख्य समस्या असल्यामुळे महापालिकेने शाई धरणाच्या कामाकडे आधी लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने राज्य शासनाकडे २२८ कोटी रुपयांचा निधी भरला तर या धरणाचे काम प्रत्यक्षात मार्गी लागले. यामुळे येत्या पाच ते सात वर्षांत शहरातील पाणी समस्या सुटू शकेल, असा दावाही त्यांनी केला. शाही धरणाच्या पाश्र्वभूमीवर विशेष महासभा घेऊन त्यामध्ये तात्काळ निर्णय घेण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक महापौरांना पत्र देऊन विशेष महासभा आयोजित करण्याची मागणी करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.