शिवसेनेकडून भाजपला पुन्हा दोन समित्यांचे सभापतीपद

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात स्थानिक पातळीवर शिवसेना भाजप एकमेकांविरुद्ध प्रचार करत आहेत. मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेत आपला एकीचा सूर त्यांनी पुन्हा एकदा कायम ठेवला आहे. मंगळवारी पार पडलेल्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडीत दोन्ही पक्षांनी सामंजस्याने समित्या वाटून घेतल्या. त्यामुळे पालिकेत पुन्हा शिवसेना भाजप एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात कधीही निवडणूकपूर्व युती न करणाऱ्या शिवसेना भाजपने अनेकदा पालिकेत मात्र युती केल्याचे दिसून आले आहे. स्वत:च्या फायद्यासाठी शिवसेनेने अनेकदा भाजपला जवळ केले आहे. गरज संपल्यानंतर तातडीने भाजपला दूर सारण्यातही शिवसेना आघाडीवर आहे. गेल्या वर्षांत झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत भाजपला दूर सारत शिवसेनेने हे पद आपल्याकडे ठेवले होते. त्यापूर्वीचे उपनगराध्यक्ष हे भाजपचे होते.

मात्र मंगळवारी पार पडलेल्या विविध विषय समित्यांच्या निवडीत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भाजपच्या वाटय़ाला दोन समित्यांचे सभापतीपद शिवसेनेने सोडले. त्यामुळे शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या आरोग्य समितीच्या सभापतीपदी श्रीधर पाटील, नियोजन समिती सभापतीपदी तुकाराम म्हात्रे, महिला व बालकल्याण समितीपदी नीलिमा पाटील आणि बांधकाम समितीवर आरती टांकसाळकर यांची वर्णी लागली. तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी भाजपच्या प्रमिला पाटील यांची निवड करण्यात आली. मागासवर्गीय समितीही भाजपला देण्यात येणार असल्याचे समजते.

स्थायी समितीच्या सदस्यपदी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, राजन घोरपडे आणि नगरसेवक अरुण सुरवळ यांची वर्णी लागली. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेना भाजप एकत्र आल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे विषय समित्यांच्या निवडीत एकत्रित बसणारे हेच लोकप्रतिनिधी शहरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात प्रचार करताना दिसत आहेत.