ठाणे, डोंबिवलीत संघाच्या संचलनाकडे शिवसेनेची पाठ

जयेश सामंत, ठाणे</strong>

पाच वर्षांपूर्वी महायुतीत फाटाफूट होताच भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शरण जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने धडपडणाऱ्या शिवसेना नेत्यांनी, यंदा युतीची समीकरणे जुळताच संघाच्या ठाणे, डोंबिवलीतील संचलनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. कल्याणमध्ये मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पवार यांनी नित्यनेमाने या संचलनात भाग घेतल्याने स्थानिक सेना नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. ठाण्यात नौपाडा, पाचपाखाडी, कोपरी, डोंबिवलीत टिळकनगर, फडके मार्ग, नवी मुंबईतील वाशी, नेरुळ आदी ठिकाणीही संघाचा प्रभाव राहिला आहे. हे लक्षात घेऊन निवडणुका आल्या की, भाजपच्या स्थानिक नेत्यांना हाताशी धरत संघ शाखांमध्ये नित्यनेमाने हजेरी लावायची, हा सेना नेत्यांचा वर्षांनुवर्षांचा शिरस्ता राहिला आहे. युती असताना ठाणे, डोंबिवलीतील संघाची फळी ‘मोठा भाऊ’ या नात्याने शिवसेनेसाठी राबताना दिसायची. पाच वर्षांपूर्वी युती मोडताच धास्तावलेल्या सेना नेत्यांनी ही ‘परंपरागत’ मते दुरावू नयेत यासाठी बरेच कष्ट घेतले होते. युती तुटल्याने शिवसेना नेत्यांना संघाच्या शाखेत घेऊ न जाण्यास भाजपचा एकही नेता पुढाकार घेत नव्हता. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी निवडणूक काळात ठाणे, कल्याणातील सेना नेते स्वत:हून प्रभात शाखांना उपस्थिती दाखवत होते. एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक आणि राजन विचारे या नेत्यांनी नौपाडय़ातील श्रीराम व्यायामशाळेतील प्रभात शाखांना भेटी देण्याचा सपाटाच लावला होता. यंदा मात्र युती झाल्याने निर्धास्त झालेल्या शिवसेना नेत्यांनी ठाणे, डोंबिवलीतील संघ संचलनाकडे पाठ फिरवली आहे.

डोंबिवलीतही सेना नेते दूरच

डोंबिवली आणि कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघात संघाचा मोठा प्रभाव आहे. पाच वर्षांपूर्वी युती नसल्याने शिवसेनेचे स्थानिक नेते उमेदवारांसह संघ संचलनात सहभागी होते. यंदा मात्र कुणीही संचलनाकडे फिरकले नाही, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली. कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी पवार यांनी संघातील जुन्या जाणत्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सल्लामसलत केल्याची चर्चा आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर येथील नगरसेवक धनंजय बोराडे यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपने  पवार यांची बंडखोरी कायम ठेवली. हे करत असताना पवार मंगळवारी संघाच्या संचलनात सहभागी झाले. या घडामोडींमुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.

* ठाणे आणि डोंबिवली भागातील संघ कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेचे चांगले संबंध आहेत. शिवसेनेचे नेते संघाच्या दसरा संचलन कार्यक्रमाला उपस्थित राहतात.

* यंदाही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दसरा संचलन कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. मात्र नेत्यांबद्दल सांगता येत नाही, असे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

संघ उत्सवाचे निरोप सर्व घटकांना दिले जातात. प्रत्येक जण आपल्या व्यस्ततेनुसार वेळ काढून कार्यक्रमाला येत असतात, अशी माहिती संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.